कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांची तब्बल नऊ तास ईडीने चौकशी केली. पावणे दहाच्या सुमारास राऊत ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले.
ईडीच्या चौकशीला आपण सहकार्य करणार असल्याचे संजय राऊत म्हणाले होते. यानुसार ते आज ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. प्रवीण राऊत आणि पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. यापूर्वी ईडीने त्यांच्या काही मालमत्ता जप्त केल्या होत्या.
अलिबागमधील आपल्या आयोजित सभेमुळे संजय राऊत मागील चौकशीला हजर राहू शकले नव्हते. त्यानंतर त्यांना ईडीने दुसरं समन्स बजावत १ जुलैला चौकशीसाठी बोलावलं. यामुळे आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास संजय राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले.
१० वर्षांनंतर पत्रा चाळ प्रकल्प रखडल्यानंतर आता सुरु असलेल्या चौकशीत संजय राऊत नकारात्मक उत्तरं देत असल्याचे वृत्त होते. संजय राऊत यांनी मला पत्रा चाळ कुठेय माहित नाही असं उत्तर ईडीला दिलं. त्यावर ईडीने मग गैरव्यवहार कसा झाला असा प्रतिसवाल केला होता. परंतू संजय राऊतांनी आपण तपास यंत्रणेला सहकार्य केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मनात काही शंका असल्यास केंद्रीय यंत्रणांसमोर जाणे हे आपले कर्तव्य आहे. आमची 10 तास चौकशी झाली आणि आम्ही पूर्ण सहकार्य केल्याचे राऊत म्हणाले.