Sanjay Raut: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. अलीकडेच आमदार मनिषा कायंदे आणि नेते शिशिर शिंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत, शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. यानंतर आता विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या डॉ. नीलम गोऱ्हे यादेखील मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. शिंदे गटाला राज्यभरातून पाठिंबा वाढताना दिसत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. तसेच शिंदे गटाला आव्हान दिले आहे.
शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्यापैकी चार आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. शिंदे गटातील १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते त्यांच्या व्यथा आणि वेदना आमच्यासमोर मांडत असतात. आम्ही त्या ऐकतो, परंतु त्यावर काही प्रतिक्रिया देत नाही. माझ्याशीही काही जण बोलले, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
...तर पुन्हा शिवसेनेचे नाव घेणार नाही
शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात आहेत. अजित पवार म्हणाले होते की, खरे नसेल तर पवार नाव लावणार नाही. तसे आम्ही सांगतो. हे जर खरे नसेल तर पुन्हा शिवसेनेचे नाव घेणार नाही, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही त्यांच्याशी बोलतो, त्यांच्या व्यथा ऐकतो, कारण ते आमचे जुने सहकारी आहेत. त्यांनी अनेक वर्ष आमच्याबरोबर काम केलं आहे. आमचे जुने संबंध आहेत. मधल्या काळात आमचा एकमेकांशी संपर्क नव्हता. परंतु गेल्या आठ दिवसापासून ते आमच्याशी संपर्क करत आहेत. आम्ही असे म्हणत नाही की, ते आमच्याकडे आले आहेत किंवा आम्ही त्यांना आमच्या पक्षात घेतले आहे. कारण, तो निर्णय आमच्या पक्षप्रमुखांचा असेल, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावर, आम्हाला राज ठाकरेंशी बोलण्यासाठी मध्यस्थाची गरज नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे भाऊ आहेत, ते वाटेल तेव्हा एकमेकांशी बोलू शकतात. राज ठाकरेंसोबतची माझी मैत्री सर्वांनाच ठाऊक आहे, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले.