Sanjay Raut News: ‘इंडिया’ या नावाने एकत्र येत भाजपच्या नेतृत्वातील एनडीचा मुकाबला करण्याचा निर्धार करत ‘इंडिया जिंकणार, भाजप हरणार!’ असा ऐक्याचा बुलंद नारा देत आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पाटणा, बंगळुरू येथील दोन बैठकांनंतर ‘इंडिया’ची महत्वपूर्ण बैठक मुंबईत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीच्या स्थळी पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. यासंदर्भात माहिती देताना संजय राऊत यांनी २०२४ रोजी केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार येणार असल्याचा दावा करत, सगळ्याचा जाब द्यावा लागेल, असा इशारा दिला आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रकरण का बंद केलं, या प्रकरणाचे पुरावे असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी का होऊ दिली नाही? याशिवाय आयएनएस विक्रांत घोटाळ्याची चौकशी का थांबवली? सुषमा अंधारेंनी एक प्रकरण बाहेर काढले, त्याची चौकशी का होत नाही? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.
२०२४ ला केंद्रात-राज्यात आमचे सरकार, सगळ्याचा जाब द्यावा लागेल
महाराष्ट्रातही पोलीस दल, तपास यंत्रणा ज्या पद्धतीने भाजपच्या इशाऱ्यावरून कारवाया करत आहेत, त्यांनी आधी काळजीपूर्वक घटना आणि कायद्याचे वाचन करावे. जे कायदेशीर आहे ते करा, तुमच्या राजकीय बॉसचे खोटे आदेश पाळाल तर याद राखा. तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. हा इशारा नाही हे सत्य आहे. २०२४ मध्ये केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार येत आहे. हे या सगळ्यांनी लक्षात ठेवावे. आज आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात आहात, २०२४ नंतर हे सगळे उलट होईल. मग प्रत्येक गोष्टीचा जाब द्यावा लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
दरम्यान, आपल्याला लोकशाही मार्गाने विरोधकांचा पराभव करता येणार नाही म्हणून राजकीय विरोधकांना खोट्या खटल्यात तुरुंगात टाकायचे, त्यांच्यावर कारवाया करायच्या हे सत्र दिल्लीपासून राज्याराज्यात सत्ताधाऱ्यांनी आरंभलेले आहे. मात्र यामुळे इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. या कारवायांमुळे इंडिया आघाडीतून कोणता पक्ष बाहेर पडेल असे कोणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.