“राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा चेहरा केले असते तर २५ ते ३० जागा वाढल्या असत्या”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 07:27 PM2024-06-29T19:27:23+5:302024-06-29T19:28:09+5:30
Sanjay Raut News: राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळणार आहे. आम्हाला १७५ ते १८० जागा मिळतील, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
Sanjay Raut News: लोकसभेत भाजपाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाला केवळ २४० जागांपर्यंत मजल मारता आली. एनडीएतील घटक पक्षांच्या पाठिंब्याने मोदी सरकार कायम राहिले असले तरी इंडिया आघाडी मोठी मुसंडी मारत भाजपाला चांगलाच धडा शिकवल्याचे बोलले जात आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानपदाबाबत मोठे विधान केले आहे.
महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली असून, त्यांचा रोख उद्धव ठाकरेंकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिल्या असून, महायुतीतील नेत्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. यातच आता, राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे चेहरे केले असते, तर इंडिया आघाडीच्या आणखी २५ ते ३० जागा वाढल्या असत्या, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
कोणतेही सरकार बिनचेहऱ्याचे असू नये
राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळणार आहे. आम्हाला १७५ ते १८० जागा मिळतील. केंद्रात राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे चेहरे ठरवले असते तर इंडिया आघाडीच्या आणखी २५ ते ३० जागा वाढल्या असत्या. कोणतेही सरकार बिनचेहऱ्याची असू नये. आपण कोणासाठी मतदान करतो हे जनतेला कळायला हवे. लोकांनी इंदिरा गांधींना, राजीव गांधींना मतदान केले. मोदींना मतदान केले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांच्या पक्षाला राज्यातील जनतेने झिडकारुन लावले आहे. ते स्वत:ला नाना फडणवीसांचे मोठे भाऊ समजत होते, पण तसे काही नाही. नाना फडणवीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते. त्या साडेतीन शहाण्यांमध्ये यांना स्थान नाही, अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली.