Sanjay Raut News: देशात जी-२० शिखर परिषद सुरू आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली प्रथमच या संमेलनाचे आयोजन होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक देशांचे नेते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. जी-२० परिषदेनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे उपस्थित असलेल्या सर्व राष्ट्रप्रमुखांसाठी डीनरचे आयोजन केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना निमंत्रण नसल्यावरून आता विरोधकांकडून टीका होत आहे.
बेल्जियम दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी तेथून सरकारवर हल्लाबोल केला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना जी-२० डीनरसाठी आमंत्रित न केल्याबद्दल सरकारवर निशाणा साधत, ६० टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विरोधी नेत्यांना सरकार महत्त्व देत नाही, याचा हा पुरावा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खरगेंना निमंत्रण नसल्यावरून सरकारवर जोरदार टीका केली.
तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांचा द्वेष करत आहात हे चुकीचे आहे
राज्याचे मन छोटे असेल तर असे होते. तुम्ही देवेगौडा, मनमोहन सिंग यांना बोलवलं. ते प्रकृतीमुळे येऊ शकत नाही. मात्र देशाच्या विरोधी पक्षाचे नेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आहेत. तुम्ही त्यांना बोलवत नाहीत. यावरून तुमच्या मनात भीती असल्याचे स्पष्ट होते. तुम्ही देशात जे काही करून ठेवता, त्याची पोलखोल होईल, विरोधीपक्षनेते ती करत असतात. राज्यकर्त्यांचे मन मोठे असावे लागते. तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांचा द्वेष करत आहात हे चुकीचे आहे, या तीव्र शब्दांत संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.
...तर बैठकीचे स्वागत करू
पुतिन येथे आलेले नाहीत, हे लक्षात घ्या. शेवटी काय मिळणार आहे? आमचे लक्ष आहे. लडाखमध्ये शेजारी देशाने घेतलेली जमिनीकडे परत मिळणार असेल तर आम्ही बैठकीचे स्वागत करू. या बैठकीमुळे जर भारताची ताकद वाढलेली असेल तर त्याचंही स्वागत करू, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, या देशात सर्व राष्ट्रांचे प्रमुख आलेले आहेत. भारतावरील कर्ज माफ होणार आहे का? किती खर्च झाला आहे? तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा बैठका महत्त्वाच्या असतात. मोदींनी ते केलेले आहे. इंदिरा गांधी, नेहरू असताना अशा प्रकारच्या बैठका झाल्याची आठवण संजय राऊत यांनी करून दिली.