मुंबई: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट (The Kashmir Files) चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. अनेक बड्या चित्रपटांना टक्कर देत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवत २०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. विरोधकांकडून मात्र यावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा द काश्मीर फाइल्स या चित्रपटावरून भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
द काश्मीर फाइल्स चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींनी या चित्रपटाचे कौतुक केल्यापासून विरोधक सातत्याने यावरून टीका करत आहेत. संजय राऊत यांनीही अनेकदा या चित्रपटावर टीका केली आहे. सामना दैनिकातील आपल्या रोखठोक सदरातून, द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार देणे बाकी ठेवलेय, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.
‘द कश्मीर फाइल्स’ला ऑस्कर पुरस्कार द्यायचेच बाकी
प्रत्येक मोठ्या माणसाचा कमीत कमी एक चमचा असायलाच हवा. भाट, भांड, तोंडपुंजे त्यातूनच निर्माण झाले. पंतप्रधान मोदी यांनी ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट आवडल्याचे जाहीर करताच देशभरातील भक्तांनी ‘द कश्मीर फाईल्स’ला फक्त ‘ऑस्कर’ पुरस्कार द्यायचेच बाकी ठेवले. मोदींनी ‘द कश्मीर फाईल्स’चा प्रचार सुरू करताच देशभरातील त्यांचे भक्त या चित्रपटाचे पोस्टर चिकटविण्याच्या कामास लागले. ही चमचेगिरीच्या अधःपतनाची हद्द असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले. चमचेगिरीचा इतिहास रामायण, महाभारत काळापासून आहे. रशिया-युक्रेन युद्धात आपले पंतप्रधान मोदी यांना कसे ओढायचे यावर भक्त मंडळीत प्रचंड खल झाला असावा, अशी बोचरी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही या चित्रपटावर भाष्य करताना, द काश्मीर फाइल्स चित्रपट अजून पाहिलेला नाही. पण हा चित्रपट पाहीन, असे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. काश्मीरवर चित्रपट काढला असेल, तर ठीक आहे. मात्र, त्याआधी एका राणा नावांच्या लेखकांनी गुजरात फाइल्सवर फार चांगले लेखन केले आहे. त्यांनीही काढलेला आहे. पंतप्रधान मोदींनी त्याचीही प्रसिद्धी करावी आणि बॅलन्स करावे, अशी खोचक टीका केली होती.