"वंदे मातरमला विरोध करणाऱ्या व्यक्तीला आमदार केलं"; राऊत म्हणाले, "फडणवीस कुठेत?"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 12:12 PM2024-10-16T12:12:57+5:302024-10-16T13:19:12+5:30

राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये वंदे मातरमला विरोध करणाऱ्याला संधी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut criticism after the appointment of Idris Nayakwadi as MLA | "वंदे मातरमला विरोध करणाऱ्या व्यक्तीला आमदार केलं"; राऊत म्हणाले, "फडणवीस कुठेत?"

"वंदे मातरमला विरोध करणाऱ्या व्यक्तीला आमदार केलं"; राऊत म्हणाले, "फडणवीस कुठेत?"

Sanjay Raut : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांपैकी सात आमदारांनी मंगळवारी विधानभवनात शपथ घेतली. हे प्रकरण कोर्टात प्रलंबित असताना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांऐवजी सात आमदारांची नियुक्ती करण्यास स्थगिती द्यावी अशी मागणी करत ठाकरे गटाने याविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने या शपथविधीमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. कोर्टाने सात आमदारांच्या नियुक्तीला स्थगितीस नकार देत या नियुक्त्या न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन असतील, असे स्पष्ट केले. यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये वंदे मातरमला विरोध करणाऱ्याला संधी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सात आमदारांची नियुक्ती करण्यात आली. भाजपचे विक्रांत पाटील, बाबूसिंग महाराज राठोड, चित्रा वाघ, शिंदेसेनेचे हेमंत पाटील, मनीषा कायंदे, अजित पवार गटाचे पंकज भुजबळ, इद्रिस नायकवडी यांना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. या शपविधीवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली.

विधानपरिषद आमदार नियुक्ती संदर्भात हायकोर्टात याचिका असताना घाई घाईनं आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी शपथविधी करण्यात आला. आमदारांची नियुक्ती घटनाबाह्य आहे. ठाकरे सरकारनं पाठलेली यादी राजभवनात प्रलंबित होती. राज्यपालांनी या नियुक्त्या करताना कोणती विशेष माहिती घेतली, असा सवाल संजय राऊत यांनी केली. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून इद्रिस नायकवडी यांना संधी दिल्यामुळेही राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागलं.

"इद्रिस नायकवडी या सांगली महापालिकेत वंदे मारतमरला विरोध करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदार करता. आता तुमचा हिंदुंचा गब्बर कुठे आहे? हिंदुत्वाची भाषा करणारे देवेंद्र फडणवीस कुठे आहेत. वंदे मातरमला विरोध करणाऱ्या एका व्यक्तीला राज्यपाल नियुक्त आमदार करता आणि त्याच्या मांडीला मांडी लावून बसता. भंपक लोकं आहात. हिंदुत्ववादी संघटनेच्या नायकवडी यांनी कार्यालयावर हल्ला केला होता. तुमची काय नियत आणि निती आहे हे आम्हाला सागा. अजून सुद्धा इतर सहा जणांच्या कुंडल्या मी काढू शकतो. तुम्ही वंदे मातरमला विरोध केलेल्या व्यक्तीला आमदार केलं आहे हे महाराष्ट्राला सांगायचे आहे. आता तुम्हाला हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीवर पिपाण्या वाजवायचे अधिकार नाहीत," असं संजय राऊत म्हणाले. 
 

Web Title: Sanjay Raut criticism after the appointment of Idris Nayakwadi as MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.