मुंबई - महाविकास आघाडीत जागावाटपावरून कोणतेही मतभेद नाही. अमित शाह दिल्लीतून येऊन आमच्यासमोर बसत नाही. आम्हाला तुकडे फेकत नाहीत, तू २, तू ४, तू ३...आम्ही एकत्रित बसतो आणि सन्मानाने जागावाटप करतो. वंचितही महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. आम्ही बैठकीतील चर्चा बाहेर उघड करत नाही, पथ्य पाळतो असा खोचक टोला संजय राऊतांनी वंचित बहुजन आघाडीला लगावला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आहे. वंचित बहुजन आघाडी अधिकृतपणे महाविकास आघाडीचे घटक आहेत. आम्ही एकत्र निर्णय घेतो, एकत्र चर्चा करतो. २ दिवसापूर्वीही जागावाटपावर चर्चा झाली. स्वत: प्रकाश आंबेडकर हजर होते. एखाद दुसऱ्या जागेवरून काही चर्चा होत असतात. पण आतमध्ये काय घडलं त्याबाबत बाहेर न बोलण्याचं पथ्य आम्ही पाळतो. ही लोकशाही आहे. काही ठरवतो, हे आपल्याला बाहेर सांगायचे नाही. परंतु त्यांच्या पक्षाचे धोरण असेल, प्रत्येक गोष्ट उघड करावी. बाहेर सांगावी. लोकांसमोर मांडावी तर ते जास्त लोकशाहीवादी आहेत. त्यामुळे त्यांच्याही भूमिकेचे आम्ही स्वागत करतो असं राऊतांनी म्हटलं.
तसेच आमचं जागावाटप दिल्लीत होत नाही. महाराष्ट्रावर अन्याय करणारे अमित शाह इथं येऊन दादागिरी करू शकत नाहीत. उद्धव ठाकरे, शरद पवार इथं आहेत. काँग्रेस नेते आहेत. प्रकाश आंबेडकर आहेत. आम्ही एकत्र बसतो आणि निर्णय घेतो असंही राऊतांनी सांगितले. त्याचसोबत चंद्रशेखर बावनकुळे स्वत:ला तिकीट मिळवू शकले नव्हते. ते नितीन गडकरींसारख्या ज्येष्ठ आणि थोर नेत्याला तिकीट देणार हा मोठा हास्यास्पद आहे असा पलटवार बावनकुळेंवर केला.
दरम्यान, आमदार अपात्र प्रकरणी सर्वोच्च न्यायलयाने दखल घेतली. सर्वोच्च न्यायालयाने आशेचे किरण देशाला दाखवले आहे. चोरमंडळाचे जे वकील आहेत ते रोज नवीन मुद्दे आणतात. सुनावणी संपली असून फक्त निकाल द्यायचा आहे. शिवसेना ही बनावट आहे का?, बाळासाहेब ठाकरे बनावट आहे ? बाळासाहेब ठाकरेंचे अस्तित्वच मान्य करत नाही हा बनावटपणा आहे. या सरकारमध्ये सर्वच गोष्टी बेकायदेशीर आणि घटनाबाह्य सुरू आहे. त्यावर न्यायालय निर्णय घेईल. खोकेवाले आमदारांनी असत्याची बाजू घेतलेली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांचे मन त्यांना खातंय असंही राऊतांनी म्हटलं.