Sanjay Raut News: बदलापूरच्या शाळेतील घटनेनंतर आता राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. शाळांमधील मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करणारा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानावरून नवा वाद निर्माण होताना दिसत असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट सवाल केला आहे.
बदलापूरचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनाबाबत विरोधकांवर संशय व्यक्त केला. तसेच चार महिन्यापूर्वी महाराष्ट्रात एका आरोपीने असे कृत्य केले होते. आम्ही फास्टट्रॅक खटला चालवला. दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा झाली, असे विधान एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले. यावरून पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्य सरकारवर तिखट शब्दांत ताशेरे ओढले.
तुम्ही महाराष्ट्रापासून काही लपवले आहे का?
तुम्ही पाहिले असेल की, मुख्यमंत्र्यांची बदलापूरच्या घटनेनंतर एक क्लिप व्हायरल झाली. मुख्यमंत्री असे सांगत आहेत की, महाराष्ट्रात अशीच घटना घडली. आम्ही ती फास्टट्रॅकवर चालवली आणि आरोपीला दोन महिन्यापूर्वी फाशी दिली. माझा असा प्रश्न आहे की, मुख्यमंत्र्यांनी सांगावे की, कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली? कोणत्या न्यायालयासमोर हा घटना चालला? कोणत्या न्यायालयाने संबंधित आरोपीला फासावर लटकवले? कोणत्या कारागृहात या आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली? यातला तपशील जाहीर करणे गरजेचे आहे. फाशीची जागा त्यांनी सांगावी. वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे फाशी दिली. एखाद्या राज्यात जर कोणाला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी राजभवनात नोंद करावी लागते. राज्यपालांचा आदेश काढावा लागतो. तुम्ही महाराष्ट्रापासून काही लपवले आहे का, असा सवाल संजय राऊतांनी केला.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री खोटारडे आहेत
महाराष्ट्राच्या राज्यपालांना माझे आव्हान आहे की, मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य त्यांनी गांभीर्याने घ्यावे आणि परस्पर त्यांनी कोणाला फाशी दिली आहे त्याची चौकशी करावी आणि तुमच्याकडे जर काही अशी नोंद असेल तर तुम्ही ते महाराष्ट्र समोर आणावे. हे मुख्यमंत्री एक नंबरचे खोटारडे आहेत. गृहमंत्री त्याहून खोटारडे आहेत. त्यांनी महाराष्ट्राला मूर्ख समजला आहे का? आमच्यावर संशय व्यक्त केलाच पाहिजे. कारण या राज्याचा मुख्यमंत्री हा संशयीआत्मा आहे. त्यांचा दिवसातला अर्धा दिवस हा संशयकल्लोळात, जादूटोणा, मंत्र, तंत्र, अंधश्रद्धा या कामात जातो. त्यांनी संशय घेणे हे सहाजिकच आहे, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, बदलापुरातील आंदोलनात लाखो लोक रस्त्यावर उतरली. त्यांच्यावरती कोणीतरी जादूटोणा केला असेल, असे कदाचित त्यांना वाटले असेल. पण, त्यांनी डोळे नीट उघडले तर त्यांना दिसेल की, बदलापूरच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. एकाच वेळेला लाखो लोक तुमच्या मुलाच्या मतदारसंघात रस्त्यावर उतरले आहेत. तुमचा मुलगा तिथे खासदार आहे. तुम्ही किंवा तुमचा मुलगा त्या आंदोलकांच्या भेटीगाठीला जाऊ शकले नाहीत. तुम्ही घाबरलेले होतात. तुम्ही म्हणतात ना ठाण्यातील नेतृत्व अनेक वर्षापासून करतो. पण, बदलापूरच्या त्या पीडित महिलेची तक्रार घ्यायला पोलीस दहा तास तयार नव्हते. हे काय विरोधकांनी केले का? त्यात विरोधकांचा काय दोष आहे, अशी विचारणा संजय राऊतांनी केली.