मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनी देशात पोहचल्यानंतर तेथील पंतप्रधान जेम्स मरापे हे मोदींच्या पाया पडले. याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. भाजपा नेतेही हा फोटो ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत आहेत. मात्र याच व्हायरल फोटोवरून संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना टार्गेट करत त्यांची खिल्ली उडवली आहे.
पत्रकारांनी या फोटोवरून प्रश्न विचारल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, पापुआ न्यू गिनी देश कुठे आहे हे तुम्हाला तरी माहिती आहे का? तो फोटो नीट पाहिला तर त्यांनी मोदींचे चरणस्पर्श नव्हे तर गुडघ्याला पाया पडले आहेत. पाया पडणे हे गैर नाही. आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्यांच्या पाया पडायला हवे. आम्हीदेखील तेच करतो. परंतु ६० लाख लोकसंख्येचा पापुआ न्यू गिनी देश आहे. पूर्णपणे आदिवासी देश आहेत. त्यांचा जगाशी काही संबंध नाही. ज्या पंतप्रधानांनी मोदींचे चरणस्पर्श केले त्या जेम्स मरापेंवर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत. काही काळासाठी ते फरारी झाले होते. त्यांनी चरणस्पर्श केला त्याचा आनंद आहे असा टोला त्यांनी लगावला.
त्याचसोबत अंधश्रद्धा, जादूटोणा, जंतरमंतर यासाठी पापुआ न्यू गिनी देश जगात प्रसिद्ध आहे. अशा देशाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींचे चरणस्पर्श केले त्याचा भाजपा डंका पिटत असतील तर त्यांना माझा नमस्कार आहे. गुवाहाटीला जाणारे जे लोक आहेत त्यांनी पापुआ न्यू गिनी देशात जायला हवे. खरा जादूटोणा, रेडे वैगेरे कापायचे असतील तर त्यांनी जायला हवे असं सांगत राऊतांनी भाजपासह शिंदे गटावरही निशाणा साधला.
देशाला लहरी राजा मिळालाय....२ हजारांच्या नोटा रद्द करणे यावर फारशी चर्चा करू नये. या देशाला लहरी राजा मिळाला आहे त्यामुळे हे गृहित धरून २०२४ पर्यंतचा काळ पुढे ढकलला पाहिजे. कर्नाटकचा निकाल हा देशातील जनतेची मानसिकता काय आहे हे दिसून येते. कर्नाटक हे हिंदुत्ववादी राज्य आहे. तरीही त्या राज्याने नरेंद्र मोदी, अमित शाह आणि त्यांच्या भाजपाचा दारूण पराभव केला हे सत्य भाजपा स्वीकारत का नाही? हे पराभव यापुढेही भाजपाच्या वाट्याला येणार आहे असं सांगत संजय राऊतांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.