मुंबई – अर्थमंत्रिपद अजित पवारांना देऊ नये असा आग्रह शिवसेनेच्या आमदारांनी धरला होता. परंतु अजित पवार यांनाच अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली. अजित पवारांच्या दिल्ली भेटीनंतर राज्यातील सूत्रे हलली आणि रखडलेला खातेवाटप जाहीर करण्यात आले. भाजपा-शिवसेना यांच्यातील काही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला आली त्यात अजित पवारांना अर्थ व नियोजन खाते देण्यात आले. मात्र यावरून शिवसेना आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु या घटनेत आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वेगळाच दावा केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, अजितदादांना अर्थ खाते तुमच्याकडे ठेवायचे असेल तर अर्थखाते तुम्ही घ्या आणि मुख्यमंत्रिपद अजित पवारांकडे द्या असा प्रस्ताव दिल्लीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर ठेवला. या प्रस्तावावर शिंदे गट माघारी फिरले. अर्थ खात्याचा कौल अजित पवारांच्या बाजूने गेला आहे. शिंदे गटाचे काहीही ऐकले नाही. राहायचे असेल तर राहा, अन्यथा जा अशा शब्दात दिल्लीतून शिंदेंना आदेश दिला. ही माझी पक्की माहिती आहे असा दावा त्यांनी केला.
तसेच अजित पवारांची धुणीभांडी शिंदे गटाला करावीच लागेल. अजित पवारच आमच्यासोबत नको अशी त्यांची भूमिका होती. पण अजित पवार आणि त्यांचे सहकारी सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गटाचे लोक टाळ्या वाजवतायेत ही त्यांची मजबुरी आहे असं सांगत अजित पवारांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्राला ते पटलेले नाही. या निर्णयाने महाराष्ट्राचे नुकसान होणार आहे. शिंदे गटाचे महत्व नाही. शिंदे गट राज्याचा पक्ष नाही. भाजपाचे धोरण वापरा आणि फेका अशी आहे. राज्यातील या दोन्ही गटाची अवस्था त्यापेक्षा वेगळे होणार नाही असा टोला राऊतांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटाला लगावला.
दरम्यान, अर्थ खाते अजित पवारांना देऊ नये यासाठी जंगजंग पछाडले. अजित पवार यांना अर्थ खात्याचा अनुभव दांडगा आहे. गेल्या वर्षभरापासून जी काही सरकारी तिजोरीची उधळपट्टी सुरू आहे. त्याला अजितदादा अर्थमंत्री म्हणून नक्कीच चाप लावतील. जाणारे जातात, कारणे शोधतात. पक्षाने शिंदेंसह अन्य कुणाला काही कमी दिले होते का? या लोकांनी पक्षाचा विस्तार किती केला याचे प्रगती पुस्तक आहे का? स्वत:पुरते पाहणारे हे लोक होते असा आरोपही खासदार संजय राऊतांनी केला.