मुंबई - ललित पाटील हा एक मोहरा आहे, या प्रकरणाचा वापर-गैरवापर राज्याचे गृहमंत्री राजकारणासाठी करताय हे दुर्दैवी आहे. संपूर्ण नाशिक ड्रग्जच्या विळख्यात आहे. ड्रग्जचे २ मोठे कारखाने उद्ध्वस्त केले. राज्यात येणारे ड्रग्ज गुजरातमधून येते हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे का? आतापर्यंत किमान दीड लाख कोटींचे ड्रग्ज हे गुजरातला पकडले. पकडलेले ड्रग्ज महाराष्ट्रात पाठवले जातंय. महाराष्ट्राचा उडता पंजाब करून राज्याच्या नशेच्या आहारी टाकायचे, राज्याची तरुण पिढी उद्ध्वस्त करायची. महाराष्ट्राला बदनाम करायचे अशाप्रकारे कटकारस्थान सुरू आहे. हे जर देवेंद्र फडणवीसांना माहिती नसेल तर त्यांनी खुशाल या विषयाचे राजकारण करावे आणि महाराष्ट्राला खड्ड्यात जाताना पाहावे अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. ड्रग्ज प्रकरणावरून त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
खासदार संजय राऊत म्हणाले की, गृहमंत्र्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल असं वागा आणि बोला ही हात जोडून देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे. उद्या नाशिकचा मोर्चा इशारा असेल. कॉलेज विद्यार्थी, शाळकरी मुले, शिक्षक, सामान्य जनता उद्या नाशिकच्या मोर्चात सहभागी होईल. कारण नाशिकपासून संपूर्ण परिसर ड्रग्जच्या विळख्यात सापडली. ललित पाटीलचे कनेक्शन नाशिकचे आहे. जे २ मंत्री या प्रकरणात आहे त्यांची देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करावी आणि त्यावर बोलावे. त्यासाठी चौकशी आयोग नेमावा. हिंमत असेल तर ज्यांच्यावर आरोप झालेत त्या २ मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत असं त्यांनी म्हटलं.
तसेच आम्हाला धमक्या देऊ नका, तुम्ही आम्हाला खोटे गुन्हे दाखल कराल. २०२४ ची बॉर्डर लाईन लक्षात ठेवा. ज्यापद्धतीने तुम्ही वागताय तुम्हालाही कुटुंब, मित्रपरिवार, व्यवहार-व्यापार आहेत. आज सत्ता आहे म्हणून तुम्ही दाबताय. ड्रग्ज प्रकरणावर गृहमंत्र्यांनी बोलावे. ड्रग्जमाफिया सांगतो, मी पळालो नाही, पळवले गेले, देवेंद्र फडणवीस यांचे डोके ठिकाणावर आहे का? त्यांनाही नैराश्याने गाठले आहे अशी टीका संजय राऊतांनी फडणवीसांवर केली.
दरम्यान, जागतिक नेते, विश्वगुरू नरेंद्र मोदींना तुम्ही बनवले. पण पंडित नेहरुंपासून इंदिरा गांधीपर्यंत, अटलबिहारी वाजपेयी यांनी इस्त्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात जी देशाची भूमिका होती ती समजून घ्यावी. सरकारने बदलली परंतु देशाची भूमिका बदलली नाही. EVM मशीनमध्ये फेरफार करण्याचे तंत्रज्ञान तुम्हाला इस्त्रायलकडून मिळाले म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत आहात. तुम्हाला बरेच काही इस्त्रायलकडून मिळाले. आम्ही इस्त्रायलच्या विरोधात नाही आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनात नाही. परंतु देशाची जी भूमिका होती, अभ्यास होता तो देवेंद्र फडणवीसांनी करायला हवे असं सांगत संजय राऊतांनी शरद पवारांवरील टीकेवर प्रत्युत्तर दिले.