सरकार घरकोंबड्यासारखे घरी बसलंय; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस-अजितदादांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 01:25 PM2023-09-07T13:25:02+5:302023-09-07T13:35:08+5:30

सरकार फक्त खोटे गुन्हे राजकीय विरोधकांवर दाखल करतंय, चोर सोडून सन्यासाला फाशी देतंय असा आरोप राऊतांनी केला.

Sanjay Raut criticizes Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis | सरकार घरकोंबड्यासारखे घरी बसलंय; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस-अजितदादांना टोला

सरकार घरकोंबड्यासारखे घरी बसलंय; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस-अजितदादांना टोला

googlenewsNext

मुंबई – महाराष्ट्रात अनेक भागात दुष्काळ आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नगर जिल्ह्यात दुष्काळी गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. खरेतर हे सरकारचे काम आहे. पण सरकार बाहेर पडत नाही. सरकार घरकोंबड्यासारखे घरी बसलंय, कुणी वर्षावर, कुणी सागरवर तर कुणी देवगिरीवर बसलंय. सरकारला भीती वाटते. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण पेटले आहे. त्यामुळे १ फूल २ हाफ सरकार बाहेर पडले तर लोकं त्यांना रस्त्यावर अडवतील आणि जाब विचारतील म्हणून ते बाहेर पडत नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, दुष्काळी भागात हाहाकार माजलाय, मराठा, धनगर, ओबीसी समाज आरक्षणासाठी लढतोय. सरकार घरी बसलंय, काय करतंय? सरकार फक्त खोटे गुन्हे राजकीय विरोधकांवर दाखल करतंय, चोर सोडून सन्यासाला फाशी देतंय. मराठीद्वेष्ट्या व्यक्तीचा भांडाफोड केला त्या पत्रकारांवर गुन्हा दाखल झाला आहे. हे नागडे-उघडे सत्य देशातील सर्व चॅनेल्सने पुढे आणले. हे एकप्रकारे टार्गेट किलिंग आहे. देशातील सर्व पत्रकार संघटनांनी, लढवय्या नागरिकांना सरकारचा धिक्कार निषेध करून जाब विचारायला हवा. सत्य सांगणे हा गुन्हा असेल तर आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान, त्यांनी हे पाहिले तर त्यांच्याही डोळ्यात अश्रू येतील असं त्यांनी म्हटलं.

तसेच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी स्वत:चे प्राण पणाला लावले आहेत. कधीकाळी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर अण्णा हजारेंनी दिल्ली आणि महाराष्ट्रात आंदोलन केले, तेव्हा हेच गिरीश महाजन अण्णांना भेटले होते. परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही. आजही भ्रष्टाचार आहे. गिरीश महाजन अण्णांना गुंडाळून आले. पण जरांगे पाटील हे गुंडाळले जाणारे व्यक्तीमत्व नाही, अत्यंत फकीर माणूस आहे. या साध्या माणसाने महाराष्ट्र सरकारला जेरीस आणले आहे. त्यामुळे तुमची गंडवागंडवी करू नका, काही असेल ते खरे बोला असा टोला संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.

दरम्यान, अखंड भारत म्हणजे या देशात सर्व जातधर्माचे लोक राहतात त्यांच्या मनात एकतेची भावना जागृत व्हायला हवी, विविधतेत एकतेने देश बनतो. केवळ जमिनीचा तुकडा नाही तर लोकांची मने जुळली पाहिजेत. इराण, पाकिस्तान, अफगाणिस्तान जो जो प्राचीन काळात आपल्या देशाशी जोडले होते त्यांना एकत्र आणा, नुसते बाता करू नका अशी टीका राऊतांनी संघप्रमुखांवर केली आहे.

सनातन धर्मावरून टीकेनंतर राऊतांनी स्पष्ट केली भूमिका

हिंदुत्वामध्ये स्पर्धा असू नये, प्रत्येकाला आपली संस्कृती, धर्म प्रिय आहे. दक्षिणेतील विशिष्ट भागातील लोकं त्यांची भूमिका वेगळी असेल. ती त्यांनी त्यांच्याकडे ठेवावी, संपूर्ण देशात अशाप्रकारे भूमिका मांडून लोकांची नाराजी ओढवून घेणे योग्य नाही. सनातन धर्माबद्दल तामिळनाडूतील मंत्री उदयनिधी मारन यांनी जे मत व्यक्त केले आहे त्याच्याशी कुणी सहमत नाही. जरी ते त्यांचे वैयक्तिक मत असेल तरी ते त्यांच्याकडेच ठेवावे. आम्ही सामना अग्रलेखातून भूमिका स्पष्ट केली आहे.

Web Title: Sanjay Raut criticizes Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.