याच मोदी सरकारने पवारांना पद्मविभूषण दिला; राऊतांचा टोला, अजित पवार - एकनाथ शिंदेंवरही खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 11:30 AM2023-10-28T11:30:42+5:302023-10-28T12:02:18+5:30
पवार कृषी मंत्री असताना त्यांनी गुजरातसाठी मदत केली हे तुम्हीच सांगत होता. ही तुमची विधाने आहेत. तुम्हाला विसरण्याचा आजार झालाय का? असा सवाल राऊतांनी विचारला आहे.
मुंबई – या राज्यात आणि देशात कृषी क्रांतीचे मोठं योगदान शरद पवारांनी दिले आहे. शरद पवार १० वर्ष कृषी मंत्री होते. मोदी सरकारच्या काळात किती कृषी मंत्री बदलले? तुम्ही कृषी मंत्र्यांना विधानसभेच्या निवडणुकीत उभे केले. याच शरद पवारांना मोदी सरकारनं सर्वोच्च पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे ते विसरले का? कृषी आणि सामाजिक क्षेत्रात पवारांचे योगदान मोठे आहे म्हणून हा पुरस्कार दिलाय. साहित्य, कृषी, सामाजिक न्याय, शिक्षण या सर्वच क्षेत्रात स्वत:च्या बळावर कार्य केले आहे. तुमच्या सरकारने किती संस्था उभारल्या आणि चालू केल्या असा सवाल करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
खासदार संजय राऊत म्हणाले की, पीएम केअर फंड बनवणे हे सामाजिक कार्य नाही. परंतु शरद पवारांच्या ट्रस्टकडून आजही हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणांसाठी मदत मिळते. भूकंप, पूरात निराधार झालेल्या मुलांना नवजीवदान दिले जाते. तुम्ही काय केले? कालपर्यंत तुम्ही त्यांना गुरु मानत होता, पवार कृषी मंत्री असताना त्यांनी गुजरातसाठी मदत केली हे तुम्हीच सांगत होता. ही तुमची विधाने आहेत. तुम्हाला विसरण्याचा आजार झालाय का? जर असं असेल तर उपचार घ्या, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. हे तुम्हाला शोभत नाही असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत तुम्ही इथं येऊन महाराष्ट्रातील नेत्यांची बदनामी करता. जे राजकीय नेते महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतात त्यांच्यावर तुम्ही चिखलफेक करता. हे योग्य नाही. एकनाथ शिंदे-अजित पवारांसमोर टीका करतात. या लोकांना तुम्ही असं बनवलं, त्यांच्यापेक्षा गुलाम चांगले आहे. अजित पवारांनी व्यासपीठावरून जायला हवं होतं. आज ते शरद पवारांवर बोलले, उद्या बाळासाहेब ठाकरेंवर बोलतील. मोदींच्या मनात कुणाबद्दलही आदराची भावना नाही. अटलबिहारी वाजपेयी असो वा लालकृष्ण अडवाणी कुणाचाही आदर नाही अशी टीकाही राऊतांनी पंतप्रधान मोदींवर केली.
दरम्यान, महाराष्ट्रात मराठा समाजाचे इतके मोठे आंदोलन होतंय, मोदींच्या सभेला शिर्डीतील ग्रामस्थांनी विरोध केला तरीही तुम्ही आंदोलनवर बोलत नाही. तुम्ही शरद पवारांवर बोलता आणखी दुसऱ्या विषयावर बोललात. तुम्ही भ्रष्टाचारावर बोलला, सर्वात मोठे भ्रष्टाचारी तुमच्या मंचावर होते, तुम्ही शिर्डीच्या साईबाबांसमोर खोटे बोलला. अजित पवारांना मंत्रिमंडळात घेण्यातच भाजपामध्ये विरोध होता. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदावरून जावं लागेल. दिल्लीतून तसा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच बदल होतील असा दावा संजय राऊतांनी केला आहे.