Sanjay Raut on Narendra Modi : तेलंगणातल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंचा ‘बाळासाहेबांचे नकली पूत्र’ असा उल्लेख केल्याने ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. काँग्रेसचे माजी सदस्य सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर बोलताना मोदींनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यासोबत भाजपने निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीबाबतही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
बुधवारी तेलंगणा इथल्या सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी पित्रोदा यांच्या विधानावरुन उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. मोदींनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख बाळासाहेब ठाकरेंची नकली संतान असा केला. काँग्रेसला वाटतं की, पश्चिम भारतातले लोक अरबमधील लोकांसारखे दिसतात. मी जरा बाळासाहेब ठाकरेंचे नकली शिवसेनेचे पुत्र आहेत त्यांना विचारतो त्यांनी जरा बाळासाहेबांना आठवावं. मला बाळासाहेंबांच्या नकली मुलाला विचारायचं आहे, त्यांचे मेंटॉर वयोवृद्ध नेत्यालाही विचारायचंय. महाराष्ट्रातील लोकांना ही भाषा मंजूर आहे?, असं मोदींनी म्हटलं होतं. त्यावर आता संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय.
"ज्यांनी हल्ले करुन महाराष्ट्राला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही याच मातीत गाडलं आहे. महाराष्ट्र संघर्ष करुन मिळवलेला आहे. एवढं त्यांना मिरच्या झोंबायचे कारण काय? मग मोदींच्या बाजूला औरंगजेबाचे फोटो लावा. तुम्ही त्याच वृत्तीचे आहात," असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं.
"जर कोणी उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे नकली पुत्र म्हणत असेल तर हा महाराष्ट्राचा आणि शिवसेनेचा अपमान आहे. बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे हे देवतेसमान आई वडील होते. सगळा महाराष्ट्र त्यांना पूजतो. मोदी हे विसरले आहेत वाटतं. बाळासाहेब ठाकरेंचा कोणी अपमान केला तर महाराष्ट्र हे सहन करणार नाही. तुम्ही तु्म्हाला असलेल्या खऱ्या पुत्राविषयी बोला. बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्याबाबतीत अत्यंत दळभद्री विधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. बाळासाहेब आणि मीनाताईंना तुम्ही नकली म्हणता. ही तुमची हिम्मत. म्हणून आम्ही म्हणतो की तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात," अशी टीका संजय राऊत यांनी केली.
मोदींवर आई वडिलांचे संस्कार नाहीत - उद्धव ठाकरे
"तेलंगणाच्या सभेत बोलताना त्यांनी माझा उल्लेख ‘बाळासाहेबांचा नकली पूत्र’ असा केला. मोदीजी मी नकली असेल तर तुम्ही बेअकली आहात. हा माझा अपमान नाही. हा माझ्या वडिलांचा म्हणजेच बाळासाहेबांचा आणि माझ्या आईचा अपमान आहे. मोदींवर कदाचित आईवडीलांचे संस्कार झाले नसतील. पण माझ्यावर झाले आहेत. मी सुसंस्कृत घरातला आहे," असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर येथे बोलताना दिलं.