मुंबई: आज बेळगाव महापालिका निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे तर महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या 3 जागांवर समाधान मानावं लागलं. या निकालानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जात आहे. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी माणसांची संघटना आहे. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, असा असं राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली. 'बेळगावला महाराष्ट्रात आणण्यासाठी शेकडो लोकांनी प्राम गमावले. बाळासाहेब तुरुंगात गेले होते. अन् याच बेळगावात मराठी माणूस हरल्यावर तुम्ही पेढे वाटता. लाज नाही वाटत तुम्हाला. जल्लोष करताना आणि पेढे वाटताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे, असंही राऊत म्हणाले.
मराठी माणूस माफ करणार नाहीराऊत पुढे म्हणाले, 'मराठी माणूस हरल्यानंतर पेढे वाटले जात आहेत. महाराष्ट्रात काहींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. राज्याच्या इतिहासात इतका नालायकपणा कधीच झाला नाही. महाराष्ट्रात अनेकांना वेदना आहे. सातारा, सांगली कोल्हापुरातून फोन येत आहेत. मराठी माणूस हरल्याबद्दल त्यांच्यात अस्वस्थता आहे आणि तुम्ही पेढे वाटता. ठिक आहे तुमचा पक्ष जिंकला असेल मराठी माणसाच्या एकजुटीचा पराभव झाला. पण याद राखा, मराठी माणसं तुम्हाला माफ करणार नाहीत, असंही ते म्हणाले.