Sanjay Raut ED Action: पत्राचाळ प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने समन्स बजावली होती. पण, अनेकवेळा राऊत यांनी चौकशी टाळली. पण, आज अखेर ईडीने संजय राऊतांच्या घरी हजेरी लावली. राऊत यांच्या निवासस्थानी सकाळी सकाळीच ईडीचे अधिकारी पोहोचले आणि संजय राऊत आणि त्यांची पत्नी यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, या प्रकरणावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, 'राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्त्यामुळे राज्यात मोठा गोंधळ उडाला आहे. त्यांच्या या वक्तव्यवरुन लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी राऊतांवर ही ईडीची कारवाई केली जात आहे. या कारवाईवर मी कसा पाहतोय यापेक्षा महाराष्ट्रातील जनता कशी पाहते हे महत्वाचे आहे. तपास यंत्रणेचा उपयोग राजकारणासाठी केला जात आहे, अशी टीका थोरात यांनी केली.
संजय राऊत यांची चौकशीशिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे (ED)पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीची टीम आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाली. सध्या शोधमोहिम आणि चौकशी सुरू असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. दरम्यान, राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा पहारा असून कोणालाही आत जाण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे.