Sanjay Raut ED Raids: मुंबईतील गोरेगावच्या पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ईडीचे ८ ते १० अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले. त्यांच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर अखेर संजय राऊत हे तपासात सहाकार्य करत नसल्याचा ठपका ठेवत ईडीने त्यांना ताब्यात घेतली. संजय राऊत आणि त्यांची पत्नी वर्षा राऊत यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. त्यानंतर अखेर ईडीचे पथक संजय राऊतांना घेऊन ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. या प्रकारानंतर, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी एक खोचक सवाल करत राज्यपाल भगत सिंह कोश्यारींवरही निशाणा साधला.
संजय राऊत यांची वाणी आणि लेखणी दोन्ही गोष्टी धारदार आहे. त्यामुळे भाजपा त्यांना घाबरली आहे. जे लोक आपल्या विरोधात बोलतील त्यांची तोंडं बंद करा असा भाजपाचा कार्यक्रम आहे. कारण त्यांची धुलाई मशिन सध्या रिकामी आहे. भाजपाकडे सध्या जे जे नेतेमंडळी गेले आहेत त्यांच्यावर भाजपानेच ईडी मार्फत गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्याचं काय झालं? फक्त महाराष्ट्रातच भ्रष्टाचारी लोकं राहतात का? इतर राज्यांमध्ये राहत नाहीत का? स्वत: राज्यपाल कोश्यारी म्हणाले की मुंबईतून गुजराती आणि मारवाडी लोकांना वेगळं केलं तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही. याचा अर्थ असा की पैसे वाले कोण आहेत आणि छापेमारी कोणावर सुर आहे? हे सगळं भाजपा घडवून आणत आहे", असे अतिशय स्पष्ट शब्दांत अरविंद सावंत यांनी मत व्यक्त केले.
दरम्यान, संजय राऊत यांना पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी ईडीने एकूण चार वेळा बोलावले होते. त्यापैकी तीन वेळा त्यांनी चौकशीला जाणे टाळले. त्यामुळे अखेरीस आज ईडीने राऊतांच्या घरीच छापा टाकला. संजय राऊत यांना जवळपास १० तासांच्या चौकशीनंतर घराबाहेर आणण्यात आले आणि पोलीस व सीआरपीएफच्या सुरक्षेमध्ये ईडी कार्यालयाकडे घेऊन गेले. संजय राऊतांना ताब्यात घेत असताना शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील आक्रमक झाले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. संजय राऊत यांना घरातून बाहेर नेताना संजय राऊतांच्या मातोश्री, त्यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि त्यांच्या भगिनी सर्व जण घराच्या खिडकीत उभ्या असल्याचे दिसले. यावेळी संजय राऊत यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाल्याचे दिसले.