नवी दिल्ली:अंमलबजावणी संचालनालयाने (ED) एका भूखंडाच्या फसव्या विक्रीशी संबंधित प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत यांना अटक केली. 1 हजार 34 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात ही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्यावरील कारवाईचे आता राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.
प्रवीण राऊत यांच्यावरील कारवाईनंतर संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर पुष्पा चित्रपटातील 'झुकेंगे नहीं' हा डायलॉग मारत टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात, 'आधी आमिष दाखवले, ऑफर्स दिल्या. मग घाबरवले, धमकावले पण आम्ही झुकलो नाही. नंतर कुटुंबाला धमकावले. आम्ही दुर्लक्ष केले, जाऊ दिले. त्यानंतर केंद्रीय एजन्सी आमच्या मागे लावल्या. हे असेच 2024 पर्यंत चालेल..पण आम्ही कधीच झुकणार नाही!', असे संजय राऊत म्हणाले. आपल्या ट्विटमध्ये राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टॅग केले आहे.
'कुछ मिला क्या?'दरम्यान, संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळीही त्यांनी ईडीच्या कारवाईवर भाष्य केले. मोदी सरकार राजकीय विरोधकांच्या नातेवाईकांवर कारवाई करते. आम्ही त्या कारवाया 2024 पर्यंत सहन करू. त्यांना काय सर्च करायचे आहे ते सर्च करू द्या. मी त्यांना विचारतोय 'कुछ मिला क्या?' हा खेळ असाच सुरू राहणा, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
ईडीने काय कारवाई केली?बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोरेगावमधील एका भूखंडाच्या विक्रीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केल्यानंतर प्रवीण राऊत यांना अटक केली. 1 हजार 34 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात ही अटक करण्यात आली आहे. प्रवीण राऊत गुरुआशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत. यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात प्रवीण यांचे नाव समोर आले होते.