Eknath Shinde Shivsena, Sanjay Raut Sharad Pawar: राज्यसभा निवडणुकी पाठापोठ विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा भाजपाने पराभव केला. भाजपाचे पाच पैकी पाचही उमेदवार विधान परिषदेवर निवडून आले. त्यानंतर आज महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता दिसत आहे. महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे अचानक गुजरातला गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्षही आपला नियोजित कार्यक्रम सोडून रात्रीच सूरतला पोहचले होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमधील सुरतच्या हॉटेलात शिवसेनेचे सुमारे २८-३० आमदार आहेत असा अंदाज वर्तवला जात आहे. या साऱ्या प्रकारावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका मांडली. तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या साऱ्या प्रकारावर काय भाष्य केलं याबद्दलही त्यांनी माहिती दिली.
नाराजी नाट्यावर शरद पवारांशी काय चर्चा झाली?
एकनाथ शिंद हे शिवसेना पक्षनेतृत्वावर नाराज आहेत अशी चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यावर महाविकास आघाडीचे शिल्पकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काय मत व्यक्त केले असे पत्रकारांनी विचारले असताना संजय राऊत म्हणाले, "शरद पवारांशी चर्चा झाली. शरदपवार स्वत: दिल्लीत आहेत. आज विरोधी पक्षाची बैठक आहे त्यासाठी ते गेले आहेत. पण त्यांनीच मला सांगितले की या सर्व घडामोडी पाहता मी दौरा रद्द केला पाहिजे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघांनी सांगितल्यामुळे मी मुंबईत थांबलो आहे आणि आम्ही सर्व जण आमच्या पद्धतीने काम करतोय."
"राजकीय भूकंप होईल असं वाटत नाही. संशयास्पद वातावरण लवकरच दूर होईल. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बडे नेते आमच्याशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्रात राजस्थान किंवा मध्यप्रदेश पॅटर्न चालणार नाही. तसे प्रयत्न सुरू आहेत पण महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही. शिवसेनेवर घाव घालणं म्हणजे महाराष्ट्र दुबळा करणं. शिवसेना निष्ठावंतांची सेना आहे. त्यामुळे सत्तेसाठी आणि पदासाठी राज्याच्या पाठीत खंजीर खुपसणारे शिवसेनेत निर्माण होणार नाहीत", असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे २८ ते ३० शिवसेनेच्या आमदारांसह गुजरातमध्ये आहेत असे सांगितले जात आहे. आधी १० ते १२ आमदारांचा गट रात्री १० वाजता सूरतला पोहोचला आहे. तर, मंत्री एकनाथ शिंदेंसह इतर आमदार सूरतला पोहोचले असून एकूण २८ आमदारांचा गट गुजरातच्या सूरतमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे गुजरात भाजपकडून या आमदारांना सहकार्य आणि मदत करण्यात येत असल्याचीही माहिती आहे.