काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी एच.एन.रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर सर्व्हायकल स्पाईनसंबंधी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहितीही डॉक्टरांकडून देण्यात आली. यानंतर त्यांची प्रकृतीही उत्तम असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं. आता शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देत त्यांनी पूर्णपणे बरे झाल्यावरच काम सुरू करावं, कोणताही धोका पत्करू नये, असा सल्लाही दिला आहे.
"मुख्यमंत्री अजूनही रुग्णायात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहेत. कालच त्यांच्यासोबत फोनवरून माझी चर्चा झाली. लवकरच ते घरी जातील," अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. "उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, राज्याचे कुटुंबप्रमुख आहेत. त्यांनी संपूर्ण बरं होऊन कामाला लागावं. कोणत्याही प्रकारचा धोका त्यांनी पत्करू नये. कारण त्यांच्यावर ज्याप्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे तो एक नाजूक विषय आहे. कोणत्याही प्रकारची कमतरता राहिली तर त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात," असंही ते म्हणाले.
"या राज्याचे ते नेतृत्व करत आहेत आणि लवकरच ते बरे होतील हा आम्हाला विश्वास आहे," असंही राऊत यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री ठाकरे यांना बुधवारी एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासण्यांनंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्यावर आधी घरगुती उपचार सुरू होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणाही झाली. मात्र पुन्हा एकदा मान व पाठदुखीचा त्रास होऊ नये यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्यायी सल्ला दिला होता.