Sanjay Raut vs Gulabrao Patil: शिवसेनेमधील एकनाथ शिंदे गटाच्या बंडाने महाराष्ट्राचं राजकारण हादरवून टाकलं. एकनाथ शिंदे गटातील ४० आमदारांच्या गटाने भाजपासोबत सत्तास्थापना केली आणि बहुमत प्रस्तावही जिंकला. यावेळी विशेष अधिवेशनात बोलताना, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असलेल्या चार जणांच्या कंडोळ्यांवर टीका केली. त्या चार डोक्यामुळेच पक्षाची वाताहत झाली, असे गुलाबराव पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले. यावर आज शिवसेनेचे संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे दुधखुळे नाहीत, ते स्वत:चे निर्णय स्वत: घेतात. ज्या चार जणांवर बंडखोर आमदार टीका करत आहेत त्याच चौघांमुळे हे लोक कालपर्यंत सत्तेत होते, असे राऊत म्हणाले.
"उद्धव ठाकरे यांच्या आसपास असलेल्या चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली. हे चार लोक पक्षाचेच काम करत होते. आजही पक्षाचेच काम करत आहेत. तुम्ही ज्या चार लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात, त्यांनी खूप काम केले आहे. या चार लोकांमुळेच गेली अडीच वर्षे तुम्ही सत्तेत होतात. त्यापूर्वीही आपलं सरकार होतं. पण आज तुम्ही त्या चार लोकांना बदनाम करत आहात. खरे तर ते शिवसेनेचे निष्ठावंत लोक आहेत", अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांना प्रत्युत्तर दिले.
उद्धवजी दुधखुळे नाहीत, ते बाळासाहेबांचे चिरंजीव!
उद्धव यांच्या जवळ असणाऱ्या चार जणांचा सातत्याने उल्लेख केला जात आहे. त्या लोकांच्या निष्ठेमुळेच पक्षाचे काम अजूनही सुरू आहे. आणि एक लक्षात ठेवा, उद्धव ठाकरे हे दुधखुळे नाहीत. ते बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. उद्धव ठाकरे हे स्वत:चे निर्णय स्वत:च घेतात. बंडखोरी करून जाणाऱ्या लोकांना काही ना काही कारण सांगायचं असतं. त्यांना बहाणा सापडत नसल्याने ते अशा गोष्टी सांगत सुटले आहेत. पण आता तुम्ही लोक पक्षातून निघून गेले आहात तर बहाणे सांगत बसू नका. आपापली कामं करा", असेही संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, गुलाबराव पाटील म्हणाले होते की आम्ही उद्धव ठाकरेंची साथ सोडली याचं आम्हाला दु:ख आहे. पण उद्धव ठाकरेंभोवती असलेल्या चार लोकांच्या कोंडाळ्याने त्यांना बावळट बनवून टाकलंय. ज्यांची निवडून यायची लायकी नाही, ते आम्हाला बोलतात आणि आमच्याच मतांवर खासदार होतात, असे शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील संजय राऊतांवर टीका करताना म्हणाले होते.