Sanjay Raut Shiv Sena: ठाण्याच्या किसन नगर येथे संजय घाडीगावकर यांची ठाकरे गटाच्या शिवसेनेत उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी खासदार राजन विचारे गेले होते. त्याच वेळी शिंदे गटाने ठाकरे गटातील उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठाकरे गटाकडून या ठिकाणी मेळावा घेण्यात येत होता. यावेळी एकनाथ शिंदे गटाचे शिवसैनिक योगेश जानकर यांच्या कार्यकर्त्याकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा आरोप आहे. या प्रसंगाबाबत आज खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
"ठाण्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाल्याची घटना घडली. असे प्रकार नारायण राणे शिवसेना सोडून गेल्यानंतरही झाले होते. पण आज ते कुठेही नाहीत. शिवसेना मात्र अजूनही आहे. ठाण्यात जे घडले ते सत्ता आणि पोलिसांच्या बळावर घडत आहे. अशा प्रकारे हल्ले घडवून शिवसैनिकांचे रक्त सांडण्याचं काम जर केलं जात असेल तर मी सांगतो की शिवसैनिकांच्या रक्ताची किंमत स्वस्त नाही. शिवसैनिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब गेल्या ५० वर्षात प्रत्येकाला द्यावा लागला आहे," असा सूचक इशारा संजय राऊतांनी दिला.
ज्यांनी शिवसैनिकांचे रक्त सांडण्याचा प्रयत्न केला...
तसेच, "नवाब मलिक आणि इतरही लोक हळूहळू बाहेर येतील. लोकांमधील उद्रेक आता दिसू लागला आहे. चुकीच्या कारवायांवर न्यायालयाचे हातोडे पडू लागले आहेत. वारंवार खोटे प्रयोग सुरू राहिले तरी आम्ही वारंवार लढा देतच राहू. ज्यांनी शिवसैनिकांचे रक्त सांडण्याचा प्रयत्न केला, ते राजकारणातून-समाजकारणातून-जनजीवनातून पूर्णपणे नष्ट झाले, त्यांचे भविष्यात फार काही चांगले झाले नाही," असा टोलाही त्यांनी लगावला.
वाढदिवशी स्वत:च्या मनाशी प्रार्थना केली!
अजित पवार सावधपणे बोलणारे नेते आहेत. अनेकदा जे त्यांच्या पोटात असतं ते त्यांच्या ओठांवर येत नाही हे आम्हाला माहिती आहे, अशी प्रतिक्रिया मध्यावधीच्या निवडणुकांबाबत बोलताना संजय राऊतांनी दिली. तर, "माझ्यावर आरोप करणे, जितेंद्र आव्हाडांबद्दल खोटं प्रकरण पुढे रेटणे यामुळे कोणाला काय विकृत आनंद मिळतोय हे मला समजत नाहीये. हे सगळं थांबायला हवं. पुन्हा एकदा महाराष्ट्राने परंपरेनुसार निर्मळ आणि पारदर्शक राजकारण करायला हवे अशी मी माझ्या वाढदिवशी स्वत:च्या मनाशी प्रार्थना केली आहे," असे राऊत शेवटी म्हणाले.