महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली होती. तसेच आरक्षणाच्या प्रश्नावरून बिघडलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती निवळण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या भेटीवरून छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवली होती. तसेच छगन भुजबळ हे मोठे कलाकार असले तरी शरद पवार हे खरे नटसम्राट असल्याचं विधान केलं होतं. आता त्या विधानाचा आधार घेत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत आणि शरद पवार यांना टोला लगावला आहे. राज्यामधील खरे नटसम्राट कोण, याचं उत्तर संजय राऊत यांना सामनाच्या अग्रलेखामधून दिलं आहे, असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, कुणाला नटसम्राट म्हणायचं, कुणाला सामान्य कलाकार म्हणायचं, याचे सर्वाधिकार संजय राऊत यांना दिलेले आहेत. त्यांचा अधिकार आहे. चक्रधर स्वामींच्या कथेसारखं हत्तीचं वर्णन दृष्टांतानुसार प्रत्येक जण करतो. कालपर्यंत शरद पवार हे संजय राऊत यांना कसे वाटत होते, हे सामनाचे जुने अग्रलेख काढून पाहावं. संजय राऊत यांची नजर ही बदलणारी आहे. त्यांची नजर बदलणारी असल्याने आज शरद पवार हे त्यांना नटसम्राट वाटत आहेत. मात्र मागे त्यांना ते दुसरेच वाटायचे. राजकारणात मी तो शब्द वापरू शकत नाही. शरद पवार यांच्याबाबत त्यांनी काय काय शब्द वापरले आहेत, हे सामनाचे जुने अंक काढले तर तुम्हाला वाचता येईल. तसेच राज्याच्या राजकारणातील कटसम्राट कोण, याचं उत्तरही त्यांनी सामनाच्या जुन्या अग्रलेखांमधून दिलेलं आहे, असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.
दरम्यान, राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून बिघडलेल्या सामाजिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली होती. तसेच राज्यातील परिस्थिनी निवळण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यात झालेली ही भेट सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीवरून आज संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांना टोला लगावला होता. ''छगन भुजबळ हे खूप मोठे कलाकार आहेत, त्यांनी चित्रपटातही काम केलेले आहे. खूप वेळा आपले रंगरूप बदलून एक नाट्य निर्माण करण्यात छगन भुजबळ माहीर आहेत. छगन भुजबळ का गेले, कशासाठी गेले, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कसा हंगामा झाला हे सर्वांना माहिती आहे. पण शरद पवार हे सर्वांत मोठे नटसम्राट आहेत, त्यांना देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रतिष्ठा आहे. महाराष्ट्रात एक खुले रंगमंच आहे ते फिरत राहतात, छगन भुजबळ यांसारखे जे नेते आहेत ते फिरत्या रंगमंचाचे कलाकार आहेत’’, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.