मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा आजचा आठवा दिवस आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत जवळपास ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. हे सर्व आमदार गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटातील अनेक आमदारांनी उघडपणे संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गट आणि संजय राऊत असा सामना रंगला आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत हे दररोज ट्विट आणि माध्यमांसमोर येऊन बंडखोर आमदारांवर टीका करताना दिसून येत आहेत.
आज सुद्धा संजय राऊत यांनी ट्विट करून शिंदे गटाला डिवचले आहे. संजय राऊत यांनी एक शायरीच्या फोटो ट्विट करून टोला लगावला आहे. "जहालत एक किस्म की मौत होती है, और जाहील लोग चलती फिरती लाशे हैं", असे ट्विट करत संजय राऊत यांनी ४० लोकांचे मृतदेह गुवाहाटीवरून येतील, या आपल्या विधानावर एका प्रकारे खुलासा केला आहे.
दुसरीकडे, शिवसेनेतील फुटीर गटातील १६ आमदारांना महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिलेल्या अपात्रता नोटिशीला उत्तर देण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाने १२ जुलैपर्यंत वाढवून दिली आहे. या नोटीसविरोधात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी येत्या ११ जुलैला होणार असल्याने महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचे ढग इतक्यात विरणार नसल्याचे दिसून येत आहे.
ईडीचे संजय राऊतांना समन्स राज्यातील राजकीय वातावरण गरम झाले असताना दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांकडून राजकीय नेत्यांची चौकशी सुरू आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने आज चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. मात्र, संजय राऊत आज चौकशीसाठी अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे संजय राऊत आज चौकशीसाठी हजर राहणार नाहीत. संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.