शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. आज त्यांची कोठडी संपत आहे. यामुळे आज पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. असे असताना संजय राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये रविवारी संजय राऊतांचा साप्ताहिक कॉलम रोख-ठोक प्रसिद्ध करण्यात आला. संजय राऊत जर आपल्या कोठडीत असतील तर सामनामध्ये त्यांचा लेख कसा काय छापून आला? असा प्रश्न ईडीच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. यावरून ईडी राऊतांची चौकशी करणार आहे.
संजय राऊत हे कोठडीत असताना लेख किंवा कॉलम लिहू शकत नाहीत. न्यायालय त्यांना विशेष परवानगी देईल तेव्हाच ते लिहू शकतात. कोर्टाकडून त्यांनी अशी कुठलीही परवानगी मागितलेली नाही, की दिलेली नाही. यामुळे राऊत यांनी तुरुंगात असताना लेख लिहिला होता? जर लिहिला तर तो बाहेर गेलाच कसा? याची चौकशी ईडी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गुजराती आणि राजस्थानींना हाकलून दिल्यास मुंबईत एकही पैसा शिल्लक राहणार नाही आणि ती यापुढे भारताची आर्थिक राजधानी राहणार नाही, अशा राज्यपालांच्या टिप्पणीबद्दल या कॉलममध्ये टीका करण्यात आली आहे. या स्तंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर टीका करण्यात आली. राऊतच्या अटकेच्या एका दिवसानंतर कोश्यारी यांनी हे वक्तव्य केल्याने ईडीसमोर हा लेख लिहिला कोणी, हे कोडे पडले आहे.
सामनाच्या कर्मचाऱ्यांनी राऊत यांच्या बायलाईन आणि फोटोसह हा कॉलम लिहिला असावा, असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. एनबीटीने याबाबतचे वृत्त दिले आहे.