नाशिक - काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये ठाकरे गटाचे नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले होते. त्यानंतर आता पुन्हा शिंदे गट उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत आहे. नाशिकमधील ठाकरे गटाची होणारी पडझड रोखण्यासाठी संजय राऊत २ दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यातच आता नाशिकचे ठाकरे गटाचे ५० पदाधिकारी हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसण्याची शक्यता आहे.
संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असताना ठाकरे गटाचे ५० पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाला नाशिकमध्ये आणखी एक धक्का बसणार आहे. मागील महिन्यात १२ माजी नगरसेवक, जिल्हा संपर्क प्रमुख यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतरही ठाकरे गटातील गळती थांबत नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू असल्यानं त्याचा फटका ठाकरे गटाला बसत आहे.
नाशिकमध्ये ठाकरे गटाचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी संजय राऊत आज आणि उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत उद्धव ठाकरे नाशिकमध्ये सभा घेतील असं सांगण्यात आले होते. मात्र तत्पूर्वी शिवसेनेसाठी तळागाळात काम करणारे पदाधिकारीच शिंदे गटात प्रवेश करत असल्याने निश्चित ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होणार आहे. पक्षाला लागलेली गळती थांबवण्यात ठाकरे गटाला अपयश येत असल्याने त्याचे परिणाम आगामी महापालिका निवडणुकांवर होतील असं चित्र सध्या नाशिकमध्ये दिसून येत आहे.
साहेब येणार, प्रवेश होणार?यापूर्वी जे ज्येष्ठ नेते नाशिकला चार-सहा महिन्यांनी यायचे, ते नेते आता महिनाभरात पुन्हा पुन्हा नाशिकला येऊ लागलेत. उद्धव ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकाराची सज्जता करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी खासदार संजय राऊत नाशिकच्या २ दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात काही विशेष घडामोडी घडवून आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. काही प्रमुख पदांवर राहिलेल्या पदाधिकाऱ्यांची नाशिकात साहेब आल्यानंतर घरवापसी व्हावी आणि शिंदे गटाला धक्का बसावा अशा स्वरुपाचे नियोजन करण्यात येत आहे. परंतु त्याआधीच शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे.