संजय राऊत २३ जागा मागतायेत, मग आम्ही कुठं लढायचं?; काँग्रेस नेत्याचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 02:50 PM2023-12-28T14:50:17+5:302023-12-28T14:52:01+5:30
कुठल्याही प्रकारे इंडिया आघाडीचे नेते आपापसातील मतभेद दूर करून एकजुटीनं भाजपाविरोधात उभे राहायचे आणि निवडणुकीत भाजपाला पाडायचे हा संकल्प आम्ही घेतला आहे असं काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले.
नागपूर - शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत किती मते आहेत हे सध्या कुणाला माहिती नाही. परंतु काँग्रेसकडे किती मते हे सगळ्यांना माहिती आहे. आमच्याकडे नेते, कार्यकर्ते सगळे आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही एकत्र बसून निर्णय घ्या, ज्यामध्ये तुमचेही भले होईल आणि आमचेही भले होईल. भाजपाला कसं रोखायचं हे ठरवा. एकमेकांना चॅलेंज देऊ नका. सगळे समान आहेत. एकदिलाने सगळ्यांना सांभाळून निर्णय घ्यावेत. सगळ्या जागा तुम्ही मागणार मग आम्ही कुठे लढायचं? असं सांगत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊतांना थेट सवाल विचारला आहे.
संजय निरुपम म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसेना-एनसीपी-काँग्रेस आणि बहुतेक वंचित बहुजन आघाडी यांची एकत्रित आघाडी होईल. या तयारीत प्रत्येक पक्षाला तडजोड करण्याची मानसिकता दाखवली पाहिजे. जास्तीच्या जागा घेऊन कुणी लढणार असेल तर त्यात दोन्ही पक्षाचे नुकसान आहे. सगळे एकत्र बसून चर्चा करू आणि ज्या जागा निवडून येतील त्या एकमेकांना वाटप करू. भक्कमपणे निवडणुकीत उतरून भाजपाला मिळणारे यश रोखून आम्ही दिल्लीत जाणार आहोत. लोकसभेत मोठे यश मिळेल. कोणाला कुठून लढायचे यावर पक्षाकडून अंतिम निर्णय घेतला जाईल.वंचित बहुजन आघाडीबाबत जो काही निर्णय असेल तो वरिष्ठ पातळीवर होईल. प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत येण्यासाठी इच्छुक असल्याचे दररोज दिसत आहे.त्यामुळे आमचे नेतृत्व त्यावर नक्कीच विचार करेल. १२ जागा तुम्ही घेणार मग आम्ही काय करणार? भाजपाला रोखायचे असेल तर प्रत्येक पक्षाला चर्चा करावी लागेल. संजय राऊत यांनी २३ जागा मागितल्या आहेत. सगळ्या जागा तुम्ही घेणार मग आम्ही कुठे लढणार? असं त्यांनी विचारले.
त्याचसोबत आगामी निवडणूक देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगूल आम्ही आजपासून वाजवणार आहे. कुठल्याही प्रकारे इंडिया आघाडीचे नेते आपापसातील मतभेद दूर करून एकजुटीनं भाजपाविरोधात उभे राहायचे आणि निवडणुकीत भाजपाला पाडायचे हा संकल्प आम्ही घेतला आहे. बेरोजगारी, महागाई कमी करण्यासाठी, सर्वधर्म समभावाने लोकांना एकजूट करण्यासाठी काँग्रेस तयार आहे. मुंबई उत्तर पश्चिम जागेबाबत कधीही तडजोड करणार नाही. ही जागा काँग्रेसची आहे. त्याठिकाणी काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेस सोडणार नाही.मुंबईत ६ जागा आहेत. राष्ट्रवादीचे प्राबल्य नाही. त्यामुळे ३ जागा शिवसेना- ३ काँग्रेस असं समीकरण बनवायला हवे. यात दोन्ही पक्षाचा फायदा होईल असा विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला.
काय म्हणाले होते संजय राऊत?
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जागावाटपाची चर्चा महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांसोबत होणार नसून ती दिल्लीत होईल. आम्ही २३ जागा लढवणार आहोत, हे आम्ही दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलं आहे. काँग्रेस हायकमांडसोबत आमचे संबंध अत्यंत मधूर आहोत," असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.