मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी पीएमसी बॅंक घोटाळ्यातील पैसे शिवसेना नेते संजय राऊत कुटुंबीयांना मिळाल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील केला होता. याप्रकरणी संजय राऊत यांनी चंद्रकात पाटील यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. (Sanjay Raut issues legal notice to Chandrakant Patil)
यासंदर्भात ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. "माझ्या आणि माझ्या पत्नीविरोधात बदनामीकारक, निराधार आणि बोगस टिप्पण्या केल्याबद्दल चंद्रकांतदादा पाटील यांना मी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. जर चंद्रकांत पाटील यांनी बिनशर्त माफी मागितली नाही, तर मी पुढील कायदेशीर कारवाई करेन आणि न्यायालयात जाईन", असे ट्विट संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता, असे चंद्रकांत पाटील यांनी पत्राद्वारे म्हटले होते. तसेच संजय राऊत हे सातत्याने माझ्यावर टीका करून मला भरपूर प्रसिद्धी मिळवून देत असतात, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. याशिवाय, संजय राऊत हे शिवसेनेचे नुकसान करत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटले होते पत्रात?तुम्ही अग्रलेखात लिहिले की, "भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले आहे की, ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल. पाटील यांना ईडीचा अनुभव कधीपासून आला?" संजयराव तुमचा प्रश्न रास्त आहे. मला ईडीचा अनुभव नाही. तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केले की, ईडीचा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करुन, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात. हे सर्व पाहिल्यावरुन मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार. असे त्रैराशिक मांडून मी अंदाज बांधला, पण मला ईडीचा अनुभव नाही हे मात्र खरेच आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.
सव्वा रुपयाचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार - संजय राऊतपीएमसी बॅंक घोटाळ्यातले पैसे राऊत कुटुंबाला प्राप्त झाले असा आरोप करणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना थेट कोर्टात खेचण्याची तयारी संजय राऊत यांनी केली. चंद्रकांत पाटील यांचे याबाबतचे पत्र सामना वृत्तपत्रात छापून आले. पण पुढच्या चार दिवसात चंद्रकांत पाटील यांना माझी कायदेशीर नोटीस जाईल. मी नोकरदार माणूस आहे, मध्यमर्गीय. घोटाळे करत बसलो असतो तर राजकारणात टिकलो नसतो असे म्हणत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांचे आरोप फेटाळले होते. शिवाय, लोक शंभर कोटींचा दावा करतात, पन्नास कोटींचा करतात. पण यांची एवढी लायकी नाही. मी यांच्यावर सव्वा रुपये अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांना कोर्टात खेचण्याचा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला होता.
मानहानीची किंमत थोडी वाढवावी, चंद्रकांत पाटलांचा राऊतांना चिमटा संजय राऊतांनी माझ्यावरील मानहानीची रक्कम वाढवावी. माझी किंमत सव्वा रुपया नक्कीच नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. आपल्या संस्कृतीत एकमेकांना चिमटे घेतले जातात, मात्र जखम होत नाही. माझी किंमत त्यांनी ठरवावी मात्र सव्वा रुपया नक्की नाही. मला संधी मिळेल त्यावेळी सातत्याने बोलणारे, सातत्याने लिहिणारे असा अवार्ड द्यायचा झाला तर मी संजय राऊतांना देईल. शिवसेनेचे दुसरे कुणी काही बोलत नाही. फक्त संजय राऊतच बोलतात. त्यासाठी तयारी करावी लागते, असेही ते म्हणाले होते.