बंडखोर आमदारांविरोधात बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली आहे. एका बापाची अवलाद असाल तर राजीनामा द्या, असे शिवसेनेचे राज्यसभा खासदार राऊत यांनी म्हटले होते. याचबरोबर गुवाहाटीतील ४० आमदारांचे कामाख्या देवीला बळी द्या, त्यांचे मृतदेह थेट पोस्टमार्टेमला पाठवू, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. यावर एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर संतापले आहेत.
संजय राऊत हे आमच्या मतांवर खासदार झाले आहेत. याच ४१ आमदारांनी राऊतांना मते दिली. यामुळे आमच्या मृत्यूवर बोलणाऱ्या राऊतांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उरलेल्या मतांवर निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान केसरकर यांनी दिले.
याचसोबत आम्हाला एका बापाचे म्हणत आहेत. हे किती घाणेरडे वक्तव्य आहे. महाराष्ट्राने महिलांचा सन्मान केला आहे. शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या पत्नीला आईची उपमा दिली होती. याच महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या शिवसेनेचे प्रवक्ते असले घाणेरडे वक्तव्य करत आहेत. हेच दुसर्या कोणी केले असते तर तो आता तुरुंगात असला असता. मुख्यमंत्री हे काही फक्त पक्षाचे प्रमुख नाहीएत, ते संविधानीक पदावर आहेत. यामुळे महाराष्ट्रात हे काय चाललेय, हे पहावे, अशी टीका केसरकर यांनी केली आहे.
याचबरोबर आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न होत आहे. आम्हाला नाही तर त्यांनाच राष्ट्रवादीत विलिन होण्याची वेळ आली आहे. १४ लोकांचा काय करायचा याचा विचार करावा, आमचे वेगळ्या गटाचे रजिस्ट्रेशन झाले आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले ३९ आणि इतर १२ असे ५१ आमदार आमच्यासोबत आहेत, असा दावाही केसरकर यांनी केला. तसेच आम्हाला नोटीस दिल्यावर सात दिवसांचा कालावधी आहे, झिरवाळ यांच्याकडून तो मागून घेणार आहोत. तसेच चौधरींना गटनेता नेमले त्यावर आव्हान देऊ, असेही केसरकर म्हणाले.