ईडीच्या चौकशीवरून शिवसेना आणि भाजपा हे पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. ईडीची चौकशी आणि भाजपा नेत्यांनी घटनेची करून दिलेली आठवण यावरून शिवसेनेनं सामनामधील अग्रलेखामधून भाजपावर घणाघाती टीका केली होती. सीबीआय आणि ईडीसारख्या संस्थांचं अध:पतन सध्या जोरात सुरू आहे. हवाबाण थेरेपीचा अतिरेक झाला की डोक्यात सडकी हवा जाते. त्या हवेच्या ढेकरा सध्या ज्यांना लागत आहेत त्यांचे नाव भाजपा. भाजपाच्या नव्या घटना समितीचा विजय असो. डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य, असा टोला शिवसेनेने सामनामधून भाजपाला लगावला होता. यानंतर भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका करत संजय राऊत यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज असल्याचं म्हटलं आहे."ज्या प्रकारची भाषा शिवसेना आणि सामनाच्या अग्रलेखातून येत आहे, त्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी किव करावी असं वाटायला लागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सुविद्य, सुविचार आणि संस्काराचा शिवसेनेनं कधीच ऱ्हास केला आहे. आज ते सत्तेत बसल्याचं दुर्देवही महाराष्ट्र पाहतोय," असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला."संजय राऊत यांना नोटीस मिळाल्यापासून ज्या पद्धतीनं लिखाण ते करत आहेत. मनापासून त्यांना एक सल्ला द्यावासा वाटतोय. त्यांनी मनसोपचार तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. मनसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची त्यांची वेळ आलीये की काय असं वाटत आहे. आम्हाला तुमची चिंता आहे. महापालिकेनंही आता प्रभादेवीजवळ मानसोपचार तज्ज्ञांचं कार्यालय सुरू करावं," असं म्हणत त्यांनी टोला लगावला.
ईडीची नोटिस आली की, चौकशीसाठी संबंधिताने जायलाच हवे. कायद्याचा सन्मान व्हायलाच पाहिजे. कायदा सगळ्यांसाठी समान. दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस म्हणतात ते देखील बरोबरच आहे. कर नाही तर डर कशाला? त्यांचे हे सांगणे बरोबरच आहे. पण या नोटिसा देशभरात फक्त भाजपाविरोधकांना का येतात हा प्रश्न आहे. देशात फक्त भाजपवालेच गंगास्नान करतात आणि बाकीचे लोक गटारस्नान करतात, असे काही आहे काय? शिवसेनेच्या बाबतीत कर नाही तर डर नाही वगैरे ठिकच, पण करून सवरून नामानिराळे राहण्याची आमची अवलाद नाही. जे केले त्याची जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत. त्याचे उदाहरण म्हणजे बाबरी विद्ध्वंस. तेथे रणातून पळून गेले ते कर आणि डरचे दाखले देत आहेत. हा विनोदच म्हणावा लागेल.