पुणे : महाराष्ट्रात विरोधकांची मोठी परंपरा आहे. उत्तम राज्य कारभार चालण्यासाठी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये उत्तम संवाद असणे आवश्यक आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्याचा अभाव जाणवत आहे. विरोधी पक्षाने आपले महत्व जाणून घेत १०५ एवढे संख्याबळ असताना समांतर सरकार चालवत आहोत असा विचार करणे गरजेचे आहे. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही. आणि सत्ता गेली म्हणून कुणी राज्याशी शत्रुत्व घेऊ शकत नाही,” अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
पुण्यात संजय राऊत यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, चांगल्या विरोधकांचं स्वागत करायला हवे असे माझे ठाम मत आहे. परंतु, विरोधी पक्ष अस्तित्वात राहू नये असे केंद्र सरकारला वाटते. लोकशाहीत उत्तम विरोधी असल्याशिवाय खऱ्या अर्थाने राज्याचा विकास होत नाही.पण राज्यात सत्तांतर घडल्यादिवसापासून विरोधी पक्षाने सरकारविरोधात जी काही भूमिका घेतली ती लोकशाहीला पूरक नाही. महाराष्ट्रात विरोधकांची मोठी परंपरा आहे.
'' महाराष्ट्रात काही लोकांना महाविकास आघाडी सरकार अस्तित्वातच येणार नाही असा पूर्ण विश्वास होता. परंतू, माझ्यासारख्या काही लोकांना राज्यात सत्तांतर होऊन याप्रकारे तीन पक्षांचे मिळून सरकार बनवता येईल असे खात्रीपूर्वक वाटत होते. आणि तसे करून देखील दाखवले. यादरम्यान काही लोकांमध्ये ठाकरे सरकार १५ दिवसांत कोसळेल अशा पैजा सुद्धा लागल्या होत्या. पण महाविकास आघाडी सरकारची लवकरच वर्षपूर्ती होते आहे. आणि आमचे सरकार पूर्ण शक्तीनिशी कार्यरत असून ते पाच वर्ष टिकेल असे ठाम मत संजय राऊत यांनी नोंदवले आहे...''
देवेंद्र फडणवीस यांच्यात राष्ट्रीय नेते होण्याची क्षमता..! “देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते असून आम्ही कायम त्यांचा सन्मान केला. ते तरुण आहेत, त्यांचा अनुभव वाढत जाणार आहे. भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील नेते होण्याची क्षमता त्यांच्यात आहे. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. ध्यानीमनी नसताना ते मुख्यमंत्री झाले. तो धक्का अजूनही ते पचवू शकलेले नाहीत. त्यातून बाहेर पडून त्यांनी पुढील राजकारण केलं पाहिजे,” असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत यांचे राज्यपालांवर टीकास्त्र....
राज्यपालांनी राजभवनात निवांत राहावं, त्यांची नेमणूक केंद्राकडून होत, पण राज्याच्या तिजोरीतून राज्यपालांवर खर्च केला जातो. राज्यपालांना राजकारण करायचं असेल तर राजभवनाच्या बाहेर या, मैदानात येऊन राजकारण करा, घटनात्मक पदाचा सन्मान राखतो ही आमची भूमिका आहे. वीजबिलासाठी कोणी राष्ट्रपतींकडे गेले नव्हते, २ जी घोटाळ्यात मंत्र्यांची नावे आली होती, म्हणून राष्ट्रपतींकडे गेलो होतो. शरद पवार आमचे नेते आहेत, राज्यपाल शरद पवारांना नेता मानतात त्याचे स्वागत करतो, पण राज्यपालांनी त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांना पंतप्रधान, राष्ट्रपतींकडे पाठवायला हवे. राज्यपालांना शरद पवारांचे मार्गदर्शन हवं असेल तर मी पवारसाहेबांना विनंती करेन की तुम्ही राज्यपालांना मार्गदर्शन करा, राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनू नये अशी टीकाही संजय राऊतांनी राज्यपालांवर केली.