मुंबई - शिवसेनेच्या आमदारांनी बंडाळी करत उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की आणली होती. तेव्हापासून हे बंडखोर आमदार शिवसेना पक्षप्रमुखांचे धोरण आणि संजय राऊतांकडून होणाऱ्या विधानांवर जोरदार टीका करत आहेत. तर संजय राऊत शिवसेनेची बाजू मांडताना बंडखोर आमदारांना फैलावर घेत आहेत. त्यातच काल शिवसेना खासदारांच्या पक्षप्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत खासदारांची राऊतांसोबत जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा होती. त्यानंतर आता संजय राऊत यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे. आता या ट्विटचा नेमका अर्थ काय, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
संजय राऊत यांनी आज सकाळी शायराना अंदाजामध्ये एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोशेजारी बसून आक्रमक अंदाजात इशारा देत असलेले संजय राऊत बसलेले आहेत. ते या ट्विटमध्ये म्हणाले की, अब नही कोई बात खतरे की,अब सभी को सभी से खतरा हैं..जौन एलिया, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. हे ट्विट देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सीएमओ महाराष्ट्र, उद्धव ठाकरे आणि प्रियंका गांधी यांना टॅग करण्यात आलं आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय? ते नेमका कुणाला इशारा देऊ इच्छिताहेत. नेमका कुणापासून कुणाला धोका आहे, असे प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत.
दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेच्या खासदारांचा पाठिंबा यशवंत सिन्हा यांनाच राहावा, अशी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची इच्छा होती. मात्र मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या अनेक खासदारांनी भाजपाच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका मांडल्याचे सांगण्यात येत आहे. खासदारांच्या या भूमिकेवर संजय राऊत नाराज झाल्याची माहिती देखील समोर आली होती.