मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हाती पक्षाचा झेंडा दिला आणि नगर जिल्ह्याला भाजपाचा बालेकिल्ला बनवण्याची जबाबदारीही सोपवली. या प्रवेशानंतर काही मिनिटांतच, शिवसेनेनं राधाकृष्ण विखे पाटील यांना आमंत्रण दिलं आहे. सुजय भाजपात गेला, आता तुम्ही शिवसेनेत येऊन युती मजबूत करा, अशी ऑफर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
डॉ. सुजय विखे यांचं खासदारकीचं तिकीट जवळपास निश्चित मानलं जातंय. नगर लोकसभेसाठी भाजपाच्या निवड समितीकडे त्यांच्या नावाची शिफारस करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्टच केलं आहे. त्यांचं तिकीट कन्फर्म झाल्यास राधाकृष्ण विखे पाटील काय भूमिका घेणार, मुलाच्या विरोधात प्रचार करणार का, यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच, शिवसेनेनं 'मौके पे चौका' मारला आहे.
आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या सुजय विखेपाटील यांची नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरच्या जागेसाठी सुजय विखे पाटील यांच्या नावाची शिफारस केंद्रीय संसदीय समितीकडे करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. सुजय विखे पाटील यांचा भाजपा प्रवेश आणि उमेदवारीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, '' सुजय विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना कुठलीही अट घातलेली नाही. मात्र भाजपामध्ये सुजय विखे यांचे नेतृत्व चांगल्या प्रकारे उदयास येईल. त्यामुळे पक्षानेही त्यांच्याबाबत योग्य असा निर्णय घेताना नगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी सुजय विखे यांच्या नावाची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी देण्याचे सर्वाधिकार संसदीय समितीकडे आहेत. मात्र आमच्याकडून झालेल्या शिफारशीला मान्यता मिळेल, असा विश्वास आहे. आता नगरची जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल.