मुंबई: राज्यात सुरू असलेला शिवसेना विरुद्ध भाजपाचा संघर्ष आता दिल्लीत पोहोचला आहे. आज भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपकडून होत आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. ''उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात एकाचवेळी राष्ट्रपती राजवट लागू करा,'' असे राऊत म्हणाले.
'...तर यांना लोक चपला मारतील'आज प्रसार माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, "भाजपचे दोन-चार लोकांचे शिष्ठमंडळ दिल्लीत गेल्याचं कळतंय, यापूर्वीही अनेकदा ते दिल्लीत गेले होते. या लोकांना काही कामधंदा नाही. कायदा सुव्यवस्थेबाबत तुमचे काही प्रश्न असतील, तर तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटायला हवं. कोणाला ओठाखाली रक्त आलं म्हणून ते थेट गृह सचिवांना भेटायला गेले. महाराष्ट्राच्या बदनामीचे षडयंत्र आहे, हे असंच सुरू राहिलं तर या महाराष्ट्रद्रोही लोकांना राज्यातील लोक जागोगाजी चपला मारतील," अशी टीका राऊतांनी केली.
'दोन्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लावा'राऊत पुढे म्हणाले की, "भाजप सतत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत आहे. तिकडे उत्तर प्रदेशात गेल्या 3 महिन्यांत 17 बलात्कार झाले. कालचे प्रकरण प्रयागराजचे आहे, तृणमूल काँग्रेसचे शिष्टमंडळ त्या मुलीला भेटायला गेले होते. तिथे राष्ट्पती राजवट लावणार का? यांची दोनचार लोकं दिल्लीत जातात, पत्रकारांना भेटतात आणि महाराष्ट्राची बदनामी करतात. राष्ट्रपती राजवट लावायचीच असेल, तर दोन्ही राज्यात एकाच वेळी लावा," अशी मागणी राऊतांनी यावेळी केली.