संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने शिवसेनेने सहाव्या जागेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. यावर संभाजीराजे समर्थकांनी आमच्यासोबत दगाफटका झाल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत हेच याला कारणीभूत असल्याचे सांगत मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी संताप व्यक्त केला. यावर राऊत यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
संभाजीराजेंना शिवसेनेची ४२ मते देण्यासाठी तयार होतो. ही जागा शिवसेनेची आहे, तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा ही आमची अट नव्हती तर भूमिका होती. छत्रपती किंवा राजघराण्याला राजकीय पक्षाचे वावडे नसावे. मोठ्या महाराजांनी शिवसेनेत, काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मालोजीराजे, स्वत: संभाजीराजे राष्ट्रवादी, भाजपा आदी पक्षांकडून निवडणुका लढले आहेत. आमदार खासदार राहिले आहेत. यामुळे त्यांच्या समर्थकांचे दावे खोटे आहेत, असे राऊत म्हणाले.
राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याचा सन्मान करणे ही आपली संस्कृती नाही, असेही राऊत म्हणाले. शिवसेनेच्या कोट्यातील जागा आम्ही संभाजीराजेंना देण्यास तयार झालो. राजघराण्याचा, संभाजीराजेंचा सन्मान ठेवला यापेक्षा आम्ही काय करू शकत होतो. देशभरातील अनेक राजघराणी राजकीय क्षेत्रात येऊन विविध पक्षांमधून आपले सामाजिक कार्य पुढे नेत आहेत, असेही राऊत म्हणाले.
मराठा संघटनांचे आरोप काय...राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी शिवसेनेने संजय पवार यांचे नाव निश्चित केले. त्यानंतर सायंकाळी विविध मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी मुंबईत संभाजीराजे यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना या प्रतिनिधींनी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर खापर फोडले. शरद पवार यांनी सुरुवातीला संभाजीराजे यांना पाठिंबा दिला होता, तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पुरस्कृत उमेदवारीला मान्यता दिली होती. संभाजीराजे यांना शिवबंधन बांधण्यास अडचण असल्यास पुढे कोणत्या पद्धतीने काम करायचे, याचा मसुदाही अंतिम करण्यात आला होता. या मुसद्यालाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंजुरी दिली होती. अटी मान्य झाल्याचे सांगितले गेले होते. मात्र, ऐनवेळी यात झालेला बदल हे राऊत यांचे पाप आहे, असा आरोप छावा संघटनेचे धनंजय जाधव यांनी केला.