मुंबई-
शिवसेनेतील नाराजी हा आमचा घरचा विषय आहे. आम्ही आमचं काय ते बघून घेऊ इतरांनी यात लक्ष देऊ नये असं सांगतानाच एकनाथ शिंदे आमचेच आहेत आणि ते परत येतील असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज केला आहे. ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी कोणताही प्रस्ताव किंवा अटी-शर्ती ठेवलेल्या नाहीत असं संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं. मग शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला का गेलेत असं विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी मिश्किलपणे ते आसामच्या काझिरंगा जंगलात सफारीसाठी गेलेत. आमदारांनी देश फिरला पाहिजे. पर्यटन केलं पाहिजे, लवकरच ते परत येतील. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असं वक्तव्य केलं आहे.
"गुवाहाटीला काझिरंगाचं जंगल छान आहे. त्यांना जंगल सफारी करू द्या. आमदारांनी देश पाहिला पाहिजे. देशात पर्यटन केल्यामुळे देशाची ओळख होते. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं काम करत असतो ते आमच्यापासून सध्या लांब आहेत. पण ते लवकरच जवळ येतील", असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईलएकनाथ शिंदेंसोबत आमचे जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. आज सकाळी देखील तासभर एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. आम्ही त्यांना आणि ते आम्हाला सोडणं शक्य नाही. ते कट्टर शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेतच राहतील आणि संपूर्ण आयुष्य शिवसेनेतच काढतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
"शिवसेना पाठीमागून असे वार करत नाही. आज सकाळी शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे आमच्या पाठिशी उभा आहे. शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे. आम्ही संघर्ष करू. जास्तीत जास्त काय होईल. सत्ता जाईल. सत्ता परत येऊ शकते. पण पक्षाची प्रतिष्ठा सत्तेपेक्षा मोठी असते", असं संजय राऊत म्हणाले.