नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अँटीलिया स्फोटके, मनसुख हिरेन मृत्यू आणि पोलिस विभागातील बदल्यांप्रकणी विविध दावे आणि आरोप समोर येत आहेत. निलंबित उपनिरीक्षक सचिन वाझेच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दबाव टाकल्याचा गौप्यस्फोट परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी ईडीच्या जबाबात केला आहे. त्यावर आता शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले.
'आरोपी इतरांचे नाव घेत असतो'दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाया, परमबीर सिंग, नितेश राणे यांची अटक अशा विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, या प्रकरणात परमबीर सिंह स्वतः आरोपी आहेत. त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे आहेत. ते मनसुख हिरेन प्रकरणातही आरोपी आहेत. ते मुख्यमंत्र्यांचे नाव घेत असतील तर घेऊद्यात, आम्हीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेतो. आरोपी स्वतःच्या बचावासाठी इतरांचे नाव घेत असतो, असे राऊत म्हणाले.
'कुछ मिला क्या?'यावेळी संजय राऊत यांनी त्यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत यांच्यावरील ईडीच्या (ED) कारवाईवरही भाष्य केले. मोदी सरकार राजकीय विरोधकांच्या नातेवाईकांवर कारवाई करते. आम्ही त्या कारवाया 2024 पर्यंत सहन करु. त्यांना काय सर्च करायचे आहे ते सर्च करू द्या. मी त्यांना विचारतोय 'कुछ मिला क्या?' हा खेळ सुरु आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
ईडीने काय केली कारवाई?बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोरेगावमधील एका भूखंडाच्या विक्रीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केल्यानंतर प्रवीण राऊत यांना अटक केली. 1 हजार 34 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात ही अटक करण्यात आली आहे. प्रवीण राऊत गुरुआशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत. यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात प्रवीण यांचे नाव समोर आले होते.