नागपूर – २०२४ च्या निवडणुकीसाठी २ वर्ष शिल्लक असले तरी महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी आतापासून लॉबिंग करणं सुरू केले आहे. या महत्त्वाचं म्हणजे मावळ मतदारसंघ(Maval Lok Sabha Constituency), ज्याठिकाणी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे(Shrirang Barane) खासदार आहेत. या जागेवर पार्थ पवार यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी द्यावी. शिवसेनेने मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सुरू झाली आहे. त्याची राज्यभर चर्चा पसरली.
नागपूरच्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी(Shivsena Sanjay Raut) यावर स्पष्टीकरण दिले आहे. राऊत म्हणाले की, मावळ लोकसभा मतदारसंघात अद्याप कुणी अधिकृत भूमिका मांडली नाही. एखादा कार्यकर्ता भावनेच्या भरात बोलतो. मात्र याची अधिकृत चर्चा नाही. पार्थ पवार हे तरूण कार्यकर्ते आहेत. राजकारणात ते काम करतायेत. पार्थ पवारांच्या(Parth Pawar) राजकीय भवितव्याबाबत त्यांचा पक्ष विचार करेल. आमच्याकडे काही प्रस्ताव आला तर त्यावर चर्चा होईल. त्यामुळे भविष्यात मावळमधून पार्थ पवार खासदार होतात का? हे पाहणं गरजेचे आहे.
२ वर्षात बरेच काही होऊ शकते – श्रीरंग बारणे
मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवारांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू झाली असताना त्यावर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निवडणुकीला २ वर्ष असताना आता ही मागणी का केली जातेय? मुळात मागणी करण्यात आली की करायला लावली अशी शंकाही बारणे यांनी उपस्थित केली. त्याचसोबत अजून २ वर्ष बाकी आहेत. त्यात बरेच स्थित्यंतर होऊ शकतात असंही सूचक वक्तव्य बारणे यांनी माध्यमांकडे केले आहे.
त्याचसोबत मावळ मतदारसंघात एक मतदारसंघ सोडला तर राष्ट्रवादीची ताकद नाही. त्यामुळे राष्ट्रवादी या गोष्टी उकरून शिवसेनेला डिवचत का आहे? गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसैनिकांच्या मनात रोष आहे. सत्तेचा सर्वाधिक लाभ हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतो अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनात आहे. सरकारमध्ये शिवसेना असली तरी शिवसैनिकांसोबत दुजाभाव केला जातो. निधीवाटपातही राष्ट्रवादीला झुकते माप मिळते अशी खंत खासदार श्रीरंग बारणे यांनी बोलून दाखवली.