नागपूर - आगामी पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शिवसंपर्क अभियान हाती घेतले आहे. यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राहुल शेवाळे, राजन विचारे, कृपाल तुमाने यांच्यासह अनेक नेते विदर्भ दौऱ्यावर आहेत. भाजपाचा गड मानल्या जाणाऱ्या नागपूरात राऊत असल्याने या दौऱ्याची विशेष चर्चा आहे. यावेळी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला.
खासदार संजय राऊत म्हणाले की, राज्यात विधानसभेचं अधिवेशन सुरु असल्याने प्रमुख नेते मुंबईत आहेत. महाराष्ट्रात तीन राजकीय पक्षांचे सरकार असलं तरी शिवसेना ही प्रमुख राजकीय पक्ष आहे. त्यामुळे संघटन बाधणीसाठी हा दौरा आहे. संघटन हीच शिवसेनेची खरी ताकद आहे. येणाऱ्या काळात शिवसेनेने अधिक ताकदीनं राज्यात काम करावं. ज्याठिकाणी शिवसेना लढू शकली नाही त्याठिकाणी कार्यकर्त्यांना बळ द्यावं. शिवसेनेबाबत समज गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय तो दूर करण्यासाठी आम्ही शिवसंपर्क अभियान हाती घेतले आहे असं त्यांनी सांगितले.
या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसैनिक नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीचा विचार करता ज्या जागा आमच्या पक्षांकडे नाही त्याठिकाणी संघटनात्मक बांधणी करून निवडणूक लढवण्याचा आमचा मानस आहे. कोल्हापूरची जागा अनेक वर्ष शिवसेना लढतेय आणि जिंकतेय. परंतु २०१९ ला शिवसेना-भाजपा युती असताना यंदा शिवसेनेचा उमेदवार पडला. काँग्रेसचा उमेदवार जिंकून आला. त्यामुळे पोटनिवडणुकीत ही जागा काँग्रेसला दिली आहे. २०२४ च्या निवडणुकीत या जागेबाबत पुन्हा चर्चा होईल असं सांगत सूचक विधान केले आहे.
विदर्भात शिवसेना पुन्हा झेप घेणार
विदर्भाने शिवसेनेला आणि बाळासाहेब ठाकरेंना खूप प्रेम दिले. युती काळात विदर्भात शिवसेनेची ताकद कमी झाली. त्यामुळे आता पुन्हा विदर्भ, मराठवाड्यात शिवसेनेचे संघटन वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्हाला राजकारण करण्याची इच्छा नाही. आम्हाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. विदर्भ, मराठवाड्यात शिवसेना पुन्हा झेप घेईल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. भावना गवळी यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणा लावण्यात आली आहे. त्यामुळे सध्या त्या कोर्टाच्या कामानिमित्त बाहेर आहेत. त्यांनी रितसर परवानगी घेऊन अनुपस्थित राहिल्या आहेत. त्यांच्या मतदारसंघात शिवसेना खासदार अरविंद सावंत गेले आहेत.
महाविकास आघाडी झाली नाही तर शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल. भाजपाचा भगवा आहे की माहित नाही. शिवसेनेचा भगवा आहे हे माहिती आहे. विदर्भात भाजपाच्या स्थापनेच्या आधीपासून शिवसेना काम करतेय. युतीच्या २५ वर्षाच्या काळात जे जागा वाटप झाले तेव्हा विदर्भातील बहुसंख्य जागा भाजपाने घेतल्या. आता पुन्हा नव्या जोमानं आम्ही इथं काम करतोय. मावळचे खासदार श्रीरंग बारणे आहेत. पार्थ पवार तरूण कार्यकर्ते आहेत. आमच्याकडे अद्याप काही प्रस्ताव नाही. वरिष्ठ नेते यावर चर्चा करतील.