मुंबई - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युती तुटली होती. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून महाविकास आघाडी करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते. असं असलं तर शिवसेना आणि भाजपा यांच्यात पुन्हा युती होणार का? याची चर्चा सुरू असते. दरम्यान, नितीन गडकरी यांनी पुढाकार घेत पूल बांधला तर शिवसेना आणि भाजपा यांच्यात पुन्हा एकदा युती होऊ शकते, असे विधान राज्य सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केले होते. त्यानंतर आता सत्तारांच्या या विधानावर संजय राऊत यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सत्तार हे पक्षात नवीन आहेत, त्यांची हळद अजून उतरायची आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी अब्दुलसत्तार यांचे कान टोचले आहेत.
संजय राऊत म्हणाले की, अब्दुल सत्तार यांनी काही पक्षाची भूमिका मांडलेली नाही. शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युतीबाबत कोण बोलतंय, कुठला मुख्य नेता बोलतोय का? हे आधी तपासून घेतलं पाहिजे. तसेच अब्दुल सत्तार हे अद्याप शिवसेनेमध्ये नवीन आहेत, त्यांची हळद उतरायची आहे. हे जे मंत्री आहेत त्यांनी पक्षात २५ वर्षे पूर्ण केली की त्यांच्य विधानाला काही अर्थ राहील, अशा शब्दात संजय राऊत यांनी अब्दुल सत्तार यांचे कान टोचले आहेत.
राऊत पुढे म्हणाले की, कुठल्याही नेत्याला पक्ष समजून घेण्यासाठी वेळ लागलो. माझ्यासारख्या व्यक्ती जन्मजात शिवसेनेमध्ये आहे. त्यामुळे मला काय बोलायचं, यासाठी कुणाकडून मार्गदर्शन घेण्याची गरज भासत नाही. मात्र जे जन्मता शिवसेनेत आलेले नाहीत, त्यांना पक्ष समजून घेण्यासाठी किमान २० वर्षे घालवावी लागतील. अब्दुल सत्तार हे काँग्रेसमधून शिवसेनेत आले आहेत. पक्षात रुळत आहेत, लोकप्रिय होत आहेत. मात्र विरोधकांच्या हातात कोलीत मिळेल, अशी विधान त्यांनी करू नयेत, असा सल्लाही त्यांनी सत्तार यांना दिला.
दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपा-शिवसेना एकत्र येण्यासंदर्भात महत्वाचं विधान केलं होतं. गडकरी राज्यात आले तर शिवसेना-भाजपचे मने जुळतील का? असा प्रश्न मंत्री अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, नितीन गडकरी ज्यादिवशी मनं जुळविण्याचा निर्णय घेतील, त्यादिवशी खरोखर मनं जुळतील, असे सत्तार यांनी म्हटलं होतं.