"पाहत रहा, पुढे काय काय होतं"; EVM वरुन टीका करताना संजय राऊतांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 07:19 PM2024-11-28T19:19:01+5:302024-11-28T19:23:17+5:30
खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ईव्हीएमवरुन सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
Sanjay Raut : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मानहानिकारक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला ५० चा आकडाही पार करता आला नाही. तर महायुतीमधल्या भाजपनेच १३२ जागा मिळवल्या आहेत. या पराभवामुळे महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाने ईव्हीएमवरुन शंका उपस्थित केली आहे. काँग्रेसने ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक पोस्ट करत सूचक विधान केलं आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचे आरोप करत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत जनमत चोरणाऱ्याला देश आणि जनता कधीही माफ करणार नाही, असं म्हटलं आहे. यासोबत ईव्हीएमवरुनही राऊतांनी टीका करत पुढे काय होतं ते पाहा असं सूचक विधान केलं आहे.
संजय राऊतांनी एक्सवर ज्याचे ईव्हीएम त्याची लोकशाही असं लिहीलेलं एक पोस्टर शेअर केलं आहे. त्यासोबत जनमत चोरणाऱ्याला देश आणि जनता कधीही माफ करणार नाही. पाहत रहा, पुढे काय काय होतं ते. जय हिंद!, असं कॅप्शन दिलं आहे.
जनमत चूरानेवालेको देश और जनता कभी माफ नहीं करेगी.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2024
देखते रहो; आगे क्या क्या होता है!
जय हिंद! pic.twitter.com/KxMKmz6dLs
याआधीही संजय राऊत यांनी ईव्हीएमवरुन भाजपवर निशाणा साधला होता. "गेल्या १० वर्षांपासून आम्ही यावर प्रश्न उपस्थित करत आहोत. काँग्रेस सत्तेत असताना भाजपने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले होते. ईव्हीएम ही देशातील फसवणूक असून ईव्हीएम नसतील तर भाजपला संपूर्ण देशात २५ जागाही मिळणार नाहीत," असं संजय राऊतांनी म्हटलं होतं.
"महाराष्ट्र आणि हरियाणामधून आलेले निकाल आम्ही स्वीकारत नाही. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या मग आम्ही ते निकाल स्वीकारू. ज्या संसदेत भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करून विरोधी पक्षनेत्याचा माईक बंद केला जातो, तिथे आम्हाला कोणता न्याय मिळणार? सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देत नसेल तर संसद आम्हाला काय न्याय देणार?," असाही सवाल संजय राऊत यांनी केला होता.