Sanjay Raut News: महाबैठकीत देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी भाग घेतला. बैठक चांगली राहिली. आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला. आपण सगळे एकत्र राहिलो तर भाजपचा पराभव निश्चित आहे, असा विश्वास विरोधकांच्या पाटणा येथील बैठकीत व्यक्त करण्यात आला. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सामील झाले होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊतही गेले होते. याबाबत संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या बैठकीत माहिती दिली. सिर्फ नाम ही काफी हैं! हे असे भाग्य एखाद्या चक्रवर्ती राजालाच मिळू शकते, असे वर्णन संजय राऊत यांनी केले.
ठाकरे गटाची एक बैठक झाली. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, पाटण्यातील बैठकीत वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. तिथे आलेल्या प्रत्येकाचा पक्ष होता, प्रत्येकाकडे स्वतःचे पक्षचिन्ह होते. आपल्याकडे काहीच नाही, ना पक्ष, ना पक्षाचे चिन्ह. तरीसुद्धा आपल्याला तिथे सन्मानाने बोलावले. मुख्यमंत्री नितीश कुमार स्वतः विमानतळावर स्वागताला आले होते. याला भाग्य लागते. हे भाग्य एखाद्या चक्रवर्ती राजालाच मिळू शकते. त्यासाठी खुर्ची असायला हवी असे काही नाही. सिर्फ नाम ही काफी हैं, असे संजय राऊत यांनी सांगितले.
जुलमी सरकार उलथवून टाकण्याचा निश्चय तिथे करण्यात आला
पाटण्यात आम्ही काल जी दृष्य पाहिली, संपूर्ण देशातील लोक तिथे जमले होते. बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. २०२४ साली महाराष्ट्रातून आणि देशातून हे जुलमी सरकार उलथवून टाकण्याचा निश्चय तिथे करण्यात आला, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजप आणि पंतप्रधान मोदींविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. नितीश कुमार यांनी देशातील अनेक मोठमोठ्या पक्षांच्या प्रमुखांना बिहारच्या पाटणा येथे आयोजित केलेल्या बैठकीला बोलावले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रमुख या बैठकीला आले होते. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या ठाकरे गटाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या बैठकीचं निमंत्रण देण्यात आले होते.