Sanjay Raut News:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने संवाद दौरा सुरू आहे. धाराशिव येथील एका सभेत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा, केंद्र सरकारवर सडकून टीका केली. या सभेत बोलताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना प्रभू श्रीरामांची उपमा देत, कोरोना काळात महाराष्ट्र वाचवल्याचे म्हटले आहे.
शिवसेना सोडून गेलेल्यांवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ज्यांना जायचे आहे, त्यांनी फडणवीस अनाजी पंतांकडे जावे, अजितदादा पवारांकडे जावे, नरेंद्र मोदींकडे जावे, जे मर्द आहेत, त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत राहावे. तर संपूर्ण महाराष्ट्रातील कवडट शिवसैनिक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचे दिसत आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ज्या हिमतीने उद्धव ठाकरे लढायला उभे राहिले आहेत, ते पाहता तुम्ही जय श्रीराम म्हणा, तुम्हाला मते मिळणार नाहीत. अजून मंदिरांची उद्घाटने करा, तुम्हाला मते मिळणार नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.
आमच्या प्रभू श्रीरामाने मुख्यमंत्रीपदावर बसून कोरोना काळात महाराष्ट्राची काळजी घेतली
शिवसेना नसती तर अयोध्येतील श्रीराम मंदिर झालेच नसते. हे महाशय गेले, रामाची प्राणप्रतिष्ठा करायला. सर्वांनी टीव्हीवर पाहिले. मात्र, प्राणप्रतिष्ठा प्रभू श्रीरामाची आहे की, नरेंद्र मोदीची हेच कळत नव्हते. प्रभू श्रीरामाची मूर्तीच दिसत नव्हती. हे सगळे कॅमेरे नरेंद्र मोदींवर होते. आम्ही रामाला शोधत राहिलो. हे यांचे असे सुरू होते, असे सांगताना, या आमच्या प्रभू श्रीरामाने मुख्यमंत्रीपदावर बसून कोरोना काळात महाराष्ट्राची काळजी घेतली. एक कुटुंबप्रमुख म्हणून, आपला भाऊ म्हणून, आमचा मुलगा म्हणून, सर्व नात्यांनी संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरेंनी वाचवला, असे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे रोज सकाळी उठल्यापासून मुख्यमंत्रीपदाच्या त्यांच्या कार्यालयातून गावागावातील स्थितीची माहिती घेत होते. आणि आपल्या कुटुंबाचे प्राण वाचवत होते. अशा या सत्यवान माणसाला, पवित्र माणसाला सोडून हे ४० गद्दार गेले. त्यांना जनता आणि देव माफ करणार नाही. हे लक्षात घ्या. मला खात्री आहे की, महाराष्ट्र याची जाणीव ठेवेल. महाराष्ट्र बेईमान नाही. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे आणि देशाचे नेतृत्व करतील, असे वातावरण आहे, असा दावा संजय राऊतांनी केला.