मुंबई - राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी असदुद्दीन औवेसी यांच्या एमआयएमनं महाविकास आघाडीला लेखी प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात २८ जागांची मागणी केल्याचं समोर आलं आहे. एमआयएमला मविआत घेणार की नाही हे आगामी काळात स्पष्ट होईल. परंतु एमआयएमच्या प्रस्तावावर ठाकरे गटाने भूमिका स्पष्ट केली आहे. नव्या पक्षाला जागा देणे कठीण आहे परंतु शरद पवारांशी आम्ही चर्चा करू असं विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
एमआयएमच्या प्रस्तावावर संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीत छोटेमोठे पक्ष आता खूप झालेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष आहेत. सीपीआय, शेतकरी कामगार पक्ष, मुस्लीम समाजाचं नेतृत्व करणारा समाजवादी पार्टी आहे, रिपब्लिकन पक्षाच्या काही संघटना आमच्या आघाडीत आहेत. अशावेळी एका नवीन पक्षाला महाविकास आघाडीत २८८ जागांपैकी जागा देणे आम्हाला कठीण दिसतंय पण शरद पवारांनी याबाबत काही भूमिका घेतली असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असं त्यांनी सांगितले.
तर एमआयएमच्या प्रस्तावाबद्दल माहिती नाही, माझ्या पक्षापुरते हे काम जयंत पाटील बघतायेत त्यांच्याकडे काय प्रस्ताव दिला असेल तो माझ्यापर्यंत आलेला नाही. जागावाटपाच्या प्रक्रियेत आमची बाकीचे लोक आहेत. मी नाही असं सांगत शरद पवारांनी एमआयएमच्या प्रस्तावावर भाष्य केले आहे.
काय आहे एमआयएमचा प्रस्ताव?
महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्याबाबत एमआयएमने लेखी प्रस्ताव दिला आहे. त्यात २८ जागांची यादी सुपूर्द करण्यात आली आहे. १० सप्टेंबरला हा प्रस्ताव दिल्यानंतर एमआयएमचे राज्य प्रमुख माजी खासदार इम्तियाज जलील यांची मविआ नेत्यांसोबत २ सकारात्मक बैठका झाल्याची माहिती आहे. एमआयएमनं उद्धव ठाकरेंना वगळता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुखांना हा लेखी प्रस्ताव पाठवला आहे. ज्याठिकाणी मुस्लीम, दलित मतदारसंघ अधिक आहे, त्या जागांची यादी एमआयएमने काढली आहे. त्या जागांवर मविआसोबत चर्चा करायला आणि तडजोड करायलाही एमआयएम तयार आहे असं जलील यांनी म्हटलं आहे.