मुंबई : भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे विनायक राऊत आहेत. दरम्यान, नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल कणकवली येथे जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसह विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला.
नुसतं बाकावर बसणारे खासदार पाहिजे की, केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा खासदार पाहिजे, असा टोला विनायक राऊतांना राज ठाकरे यांनी लगावला. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बाकावर बसणाऱ्या खासदारांनी अनेक विकास केले आहेत. परंतु, मौनी खासदाराचं कौतुक करण ही सध्या राज ठाकरे यांची मजबुरी असल्याचे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवायचे आणि महाराष्ट्राचा विध्वंस आणि विनाश करणारे प्रकल्प आमच्या माथी मारायचे. आमच्या शेती, फळबागा, जमीन याचं नुकसान करायचं. सध्या मोदी- शहांचे नवीन भक्त झालेले खरोखरचं महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत का? याचे त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला. याचबरोबर, राज ठाकरे यांचे नाव न घेता संजय राऊत यांनी त्यांना नकली मोदी भक्तदेखील म्हटलं आहे. ते म्हणाले, काही मोदींचे अंध भक्त मधेच जागे होतात. पण ते ही नकली अंध भक्त असतात. काही दिवसांतच त्यांचे विचार बदलतील. नारायण राणे यांनी मोदींच्या मंत्रीमंडळात काय दिवे लावले? याचा खुलासा त्यांची वकिली करणाऱ्या नेत्यांनी करावा. १० पक्षांतर करुन मंत्रीपद घेणे हा विकास आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
विनायक राऊत यांना बाकावर बसणारा खासदार म्हणणं चुकीचं आहे. बाकावर बसून, बाक बडवून अनेक खासदारांनी आपले प्रश्न लोकसभेत मांडले आहेत. विकास कोकणात आणला आहे. असं बोलून राज ठाकरेंनी कोकणातील खासदारांचा अपमान केला आहे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच, मौनी खासदाराचं कौतुक करण ही सध्या राज ठाकरेंची मजबुरी असल्याचे संजय राऊत म्हणाले.
मोदी शहांनी महाराष्ट्रातील प्रकल्प पळवले. भ्रष्टाचारावर हल्ले केले. त्यावर नारायण राणेंनी तोंड उघडलं का? हे नकली अंधभक्त आहेत, उद्या त्यांची भक्ती बदलू शकते. तसेच, महाराष्ट्र, मुंबईतील प्रकल्प गेले. महाराष्ट्राची सध्या लुट चालू आहे, त्यावर नारायण राणे- राज ठाकरे जोडीने तोंड उघडलं का? असा खोचक सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.