लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठं यश मिळाल्यानंतर मविआमधील नेत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान, आता काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीमधील तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये जोरदार जुगलबंदी सुरू आहे. त्यात आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे केलं आहे. त्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली असून, संजय राऊत यांच्या विधानावर भाष्य करणार नाही असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, संजय राऊत यांच्या विधानावर भाष्य करणार नाही असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीत काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे पण मोठा भाऊ, छोटा भाऊ अशी कोणतीच भूमिका नसून सर्वांनी एकत्रपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे असेही नाना पटोले यांनी सांगितले.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव पुढे करताना संजय राऊत म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला पाहिजे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणे धोका आहे. महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे काम पाहिले आहे. लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनही झालेलं आहे. अर्थातच तिघांचीही ताकद एकत्र होती. पण बिन चेहऱ्याचे सरकार, हे अजिबात चालणार नाही. लोक स्वीकारणार नाहीत. लोकांना चेहरा द्यावाच लागेल, असे संजय राऊत म्हणाले.