Sanjay Raut vs Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील मतदारांना भाजपाने गृहित धरलं. राज्यातील प्रमुख घटक भाजपावर नाराज आहे. देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलायचे तर, ते वारंवार बोलत आहेत की त्यांना अटक करण्याचे षडयंत्र रचले जात होते. त्यांची जुनी भाषणे काढून पाहिलीत तर ते म्हणायचे की, मी वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजायलाही कमी करणार नाही. असा हिंमतवाला माणूस अटकेला कशाला घाबरतो? त्यांना अटकेची भीती का वाटते? असा खोचक सवाल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना केला. ते नाशिकमध्ये बोलत होते.
"आमच्या विरोधात खोटे खटले दाखल केले गेले. मला तुरूंगात टाकण्यात आले. अनिल देशमुखांवर खोटे आरोप करण्यात आले. नवाब मलिक यांच्याविरोधातही षडयंत्र रचण्यात आले आहे. आम्हाला विविध प्रकारचे त्रास देण्यात आले. कारण नसतानाही अटक करण्यात आली, पण आम्ही अटकेला घाबरलो नाही. त्यामुळेच आम्हाला कधी अशा प्रकारची भीती वाटली नाही", असेही राऊत म्हणाला.
कसबा, चिंचवड पोटनिवणुकीबद्दल...
"शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तीन पक्षांनी आजही एकजूट आहे. पुण्यातील पोटनिवडणूक आमची महाविकास आघाडी नक्कीच यशस्वी होईल. भाजपामध्ये अंतर्गत गटबाजी किंवा राजकारण किती स्तरावर आहे हे मला बोलायचे नाही. पण पुण्यात किंवा एकूणच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात भाजपाविरोधात असंतोष आहे. आणि शिवसेनेबद्दल प्रेम आणि सहानुभूती आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना विजयी झाली. माझ्या माहितीनुसार, कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवणुकीत 'नोटा'चं प्रमाण वाढू शकतं असं मला वाटतं.