Maharashtra Politics: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे काँग्रेसमध्ये नवा उत्साह आल्याचे बोलले जात आहे. राज्यातील महाविकास आघाडीला यामुळे बळकटी मिळण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाला आहे. अशातच मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना सोडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे, असा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राऊत यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकावर गंभीर आरोप करत हे सरकारच बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात १६ आमदारच नव्हे संपूर्ण सरकार अपात्र असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असतानाही शिंदे, फडणवीस हे बेशरमपणे, निर्लज्जपणे निकाल हा आपल्या बाजूने लागल्याचे सांगत आहेत. हे संपूर्ण सरकारच बेकायदेशीर असल्याने पोलीस, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या सरकारचे आदेश पाळू नयेत, असे आवाहन संजय राऊत यांनी केले होते. त्यामुळे नाशिक पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यावर मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना सोडण्यासाठी माझ्यावर दबाव
कोणतेही चुकीचे वक्तव्य केले, असे वाटत नाही. सामान्य माणसाच्या मनातील कायद्याच्या चौकटीतील व्यथा व्यक्त केल्या आहेत. पण माझ्यावर दबाव आणला जात आहे. माझ्यावर काहीही करून माझ्यावर दबाव आणणे? शरण यायला भाग पाडणे? मग शिवसेना सोडायला लावणे, उद्धव ठाकरे यांना सोडायला लावणे अशा प्रकारची दबाव नीती माझ्यावर केली जात आहे. या दबावाला बळी पडणार नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच महाराष्ट्रातील सरकार संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, ज्याला तुम्ही सत्ता संघर्ष म्हणतात, त्यावरून या सरकारमध्ये अजूनही अपात्रतेची टांगती तलवार आहे हे स्पष्ट झाले आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाला असला तरी मी त्या कारवाईला सामोरे जाईन, असे सांगत अशा बेकायदेशीर सरकारचे आदेश कुणी पाळू नये, ते आता बेकायदेशीर ठरतील. बेकायदेशीर आदेशाचे पालन केल्याबद्दल भविष्यामध्ये त्या अधिकाऱ्यांना चौकशीला कारवाईला सामोरे जावे लागेल. ही भूमिका मी मांडली. देशभरामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य नेहमी केले जातात. पण वक्तव्य संजय राऊत यांनी केले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्याचे आदेश नाशिकच्या पोलिसांवर आले, असा दावा संजय राऊत यांनी केला.