बाबा सिद्दीकी अजितदादा गटात जाणार? संजय राऊतांची टीका; म्हणाले, “देश माफ करणार नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 01:07 PM2024-02-02T13:07:48+5:302024-02-02T13:07:58+5:30

Sanjay Raut News: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जागा रिकामी झाल्यास तिथे आम्हीच जिंकू, असा दावा संजय राऊतांनी केला.

sanjay raut reaction on baba siddiqui likely to join ncp ajit pawar group | बाबा सिद्दीकी अजितदादा गटात जाणार? संजय राऊतांची टीका; म्हणाले, “देश माफ करणार नाही”

बाबा सिद्दीकी अजितदादा गटात जाणार? संजय राऊतांची टीका; म्हणाले, “देश माफ करणार नाही”

Sanjay Raut News: काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसमधील नेते पक्षाला रामराम करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी आणि आमदार झिशान सिद्दिकी राष्ट्रपती अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांनी रात्री उशिरा अजित पवार यांची भेट घेतल्याचा दावा केला जात आहे. नवाब मलिक यांना भाजपाचा विरोध पाहता सिद्दिकी यांच्यासारखा मोठा मुस्लिम चेहरा अजित पवार गटाच्या गळाला लागण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे. 

समाज आणि देश त्यांना माफ करणार नाही

बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाऊ शकतात. याचा अर्थ ते भाजपाबरोबर जात आहेत. आतापर्यंत त्यांनी प्रवेश केलेला नाही. ते झिशान सिद्दीकीसह अजित पवार गटात गेल्यास तिथे विधानसभेची जागा रिकामी होईल. त्यानंतर तिथे शिवसेना जिंकेल. या मतदारसंघातील मुस्लिम समाजात फूट पाडण्याकरता भाजपाकडून हे केले जात आहे. बाबा सिद्दीकीसारखे लोक असे करत असतील तर समाज आणि देश त्यांना माफ करणार नाही, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.

दरम्यान, छगन भुजबळ भाजपात जाणार असल्याचा मोठा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. यावर, अंजली दमानियांचे वक्तव्ये ऐकले. छगन भुजबळ कोणत्या पक्षात जाणार हे मी सांगू शकत नाही. पण ते भाजपाचा चेहरा बनू शकतात. हसन मुश्रीफ, अजित पवार, भावना गवळी भाजपाचे चेहरा बनले आहेत. भ्रष्टाचारच भाजपाचा चेहरा आहेत. जो भ्रष्टाचारी भाजपासह चालेल तो पवित्र बनेल, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.

 

Web Title: sanjay raut reaction on baba siddiqui likely to join ncp ajit pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.